हवेतील धूलीकण कमी करण्यासाठी नवी मुंबईत डस्ट सप्रेशन व्हेईकलव्दारे प्रभावी कार्यवाही
नवी मुंबई, दि. ७: पावसाच्या उघडीपीनंतर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात साचलेली माती सुकून हवेतील धुळीचे प्रमाण जरा वाढलेले दिसते. यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ब्रश तसेच फ्लीपर मशीन यांच्या सहाय्याने रस्त्यांच्या तसेच पदपथाच्या कडेला साचलेली माती साफ करुन त्या ठिकाणाहून उचलून नेण्यात येत आहे. याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांत सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत आहेत.
त्यासोबतच राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (NCAP) नवी मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या ५ अत्याधुनिक डस्ट सप्रेशन व्हेईकलव्दारे हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्याची प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे-बेलापूर रोड, आम्र मार्ग, एआयडीसी क्षेत्रातील मुख्य रस्ते, पामबीच मार्ग अशा वर्दळीच्या रस्त्यांवर या वाहनाव्दारे हवेत पाण्याचे हलके फवारे मारुन हवेतील धूलीकण कमी करण्यात येत आहेत. त्यासोबतच रस्ते व पदपथांच्या कडेलाही पाणी मारुन स्वच्छता करण्यात येत आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील शुध्द केलेले प्रक्रियाकृत पाणी वापरले जात आहे.
या आधुनिक वाहनाव्दारे हवेत पाण्याचे हलके फवारे सोडण्यात येतात, त्यामुळे हवेतील धूळ खाली जमिनीवर बसते व त्याठिकाणी वाहनातील ब्रशींग सिस्टिमव्दारे पाणी मारून सफाई करण्यात येते. त्यासोबतच या वाहनाव्दारे रस्त्याच्या कडेला असलेल्या तसेच दुभाजकांमध्ये असलेल्या झाडांवरही हलके फवारणी करुन त्याठिकाणची धूळ व कार्बनचे कण धुवून घेण्यात येत आहेत. ही ५ वाहने सकाळी ७ ते ३, ३ ते ११ व ११ ते ७ अशा तीन शिफ्टमध्ये २४ तास चालविली जात असून त्यांनी आपल्या शिफ्टमध्ये कोणत्या रस्त्यावर कार्यवाही करायची याचे विभागनिहाय वेळापत्रक आखून दिलेले आहे व त्यानुसार स्वच्छता करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवेची शुध्दता चांगली रहावी याकरिता महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून या ५ डस्ट सप्रेशन व्हेईकलमुळे हवेतील पीएम १० आणि पीएम २.५ हे धुलीकण कमी करण्यास फॉगींगव्दारे मदत होते तसेच रस्ते, पदपथ, दुभाजक यांचीही सफाई केली जाते.
