अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुंबई, दि. ४: तीन महिन्यांपूर्वी बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. यात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यापासून मुंडे यांच्यावर विरोधकांकडून मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. आज अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला आहे.
या प्रकरणात गेल्या आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ज्यात धनंजय मुंडे यांचे निकाटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव प्रथम क्रमांकाचे आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपचे आमदार सुरेश धस, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, खा. सुप्रिया सुळे, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी तसचं नैतिकतेला धरुन आणि तब्येत ठिक नसल्यानं राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावर संदेशात म्हटलं आहे.
