अखेर ‘ते’ पुन्हा आलेच! महाराष्ट्राचे २१वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई, दि. ०४: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचं कुतूहल आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं संपलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते उद्या महाराष्ट्राचे २१वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपाच्या गाभा समितीच्या आज झालेल्या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेसाठी मुख्य निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यावेळी उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड जाहीर करण्यात आली. देवेवंद्र फडणवीस यांनी यावेळी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ फडणवीस तिसऱ्यांदा घेणार आहेत, तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे.
Source – AIR
