‘डीप क्लिनींग ड्राईव्ह’च्या प्रभावी अंमलबजावणीतून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात हवा गुणवत्ता सुधारणा
नवी मुंबई, दि. ०९: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागांमध्ये ३० डिसेंबरपासून सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning Drive) राबविण्यास प्रभावीपणे सुरूवात करण्यात आली असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार अगदी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही मोहीमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या अंतर्गत ६ जानेवारी रोजी कोपरखैरणे विभागात तीन टाकी ते घणसोली नाल्यापर्यंतचा मुख्य रस्ता, वाशी विभागहात जुहूगाव परिसरातील मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. ७ जानेवारी रोजी कोपरखैरणे विभागात तीन टाकी ते डि मार्ट पर्यंतचा मुख्य रस्ता, घणसोली विभागात सेक्टर ७ डि मार्ट ते राजीव गांधी कॉलेजपर्यंतचा मुख्य रस्ता, वाशी विभागात सेक्टर ३ ॲबट हॉटेलजवळचा परिसर तसेच दिघा विभागात दिघा रेल्वे स्टेशन ते मुकंद कंपनी पर्यंतचा मुख्य रस्ता यांची दुतर्फा सखोल साफसफाई करण्यात आली.
८ जानेवारी रोजी ऐरोली विभागात सेक्टर १४ गणपती मंदीर परिसरात, कोपरखैरणे विभागात कलश उद्यान सर्कल ते बालाजी गार्डन सोसा. पर्यंतचा मुख्य रस्ता तसेच वाशी विभागात सायन पनवेल महामार्ग आणि घणसोली विभागात सेक्टर १ दर्गा ते पामबीच मार्ग मुख्य रस्त्याची सखोल स्वच्छता करण्यात आली. याशिवाय इतरही विभागांतील मुख्य रस्त्यांवर डीप क्लिनींग करण्यात आली.
या डीप क्लिनींग मोहीमांमध्ये रस्ते, पदपथ यांच्या कडेला साठून राहिलेली माती व कचरा यांची हँडब्रशने व त्यानंतर प्रक्रियाकृत पाणी मारुन यांत्रिकी वाहनाने साफसफाई करण्यात आली. तसेच फॉगींग मशीनव्दारे हवेत पाण्याची फवारणी करुन धूळीचे प्रमाणही कमी करण्यात येत आहे. पदपथाच्या बाजूच्या भिंती, कुंपण, शिल्पाकृती यांचीही साफसफाई करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ १ उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ २ उपआयुक्त संतोष वारुळे तसेच परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि विभागातील कर्मचारीवृंद व स्वच्छताकर्मी यांच्या माध्यमातून धुळीचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सखोल साफसफाई करण्यात येत आहे. याव्दारे नवी मुंबईतील वायू प्रदूषण कमी होण्यास हातभार लागत आहे.
