“…तुमचे चित्रपटावर गुंतवलेले कोट्यवधी रुपये शून्य झाले की मग रडू नका” म्हणत मराठी प्रेमीकडून चित्रपटाच्या टीम ला विनंती वजा इशारा
मुंबई, दि. १२: चित्रपटाच्या नावावरून वादंग होणं ही भारतात काही नवी गोष्ट नाहीये. येत्या २० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा ‘द बॉम्बे ब्लड’ हा एका भारतीय दिग्दर्शकाचा इंग्रजी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्याच्या नावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गौरव हृषिकेश ठाकूर लिखित दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी विशेषतः मराठी प्रेमींनी चित्रपटाच्या शीर्षकात असलेल्या ‘बॉम्बे’ या शब्दाबाबत आक्षेप नोंदवला. द बॉम्बे ब्लड The Bombay Blood च्या ऐवजी द मुंबई ब्लड असे चित्रपटाचे नाव बदलावे असे सल्ले, इशारे मराठी प्रेमींकडून देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांनी समाजमाध्यमावर या संबंधी एक पोस्ट लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या पोस्ट मध्ये ते म्हणतात, “हे इंग्रजी चित्रपटाचं पोस्टर माझ्या नजरेत आलं. ते पाहून माझ्या तळापायची आग मस्तकात गेलीय. चित्रपटाचं नाव आहे “द बॉम्बे ब्लड’. ‘Bombay बॉम्बे’ चं ‘मुंबई’ होऊन आज जवळपास ३१ वर्ष झाली. पण अजूनही मुंबई नाव ठेवायला कमी पणा वाटतो का? की मुंबई शब्द मराठी माणसाचा म्हणून कमी दर्जाचा वाटतो? की कॉंट्रोवर्सी करण्यासाठी असं नाव ही लोकं जाणीवपूर्वक ठेवतात? या चित्रपट क्षेत्रातल्या लोकांचं पाहिलंय मी.. कधी यांचे इंटरव्ह्यु पहा बॉम्बे बोलतात.. मुंबई बोलायला यांची जीभ झडते की काय कळत नाही.. हेच त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या बाबतीत आहे.. कधी नाव बदलणार Bombay Highcourtचं मुंबई उच्च न्यायालय.. मुंबईचं बॉम्बे Bombay करणाऱ्यांना अद्दल घडवली पाहिजे.”
पुढे ते म्हणाले, “तुमच्या बापाचं नाव राकेश चं रमेश केलेलं चालेल का? उगाच डोकं तापवायची कामं करतात… ही परप्रांतीय लॉबी आपला मुंबईतला ठसा मिटवू पहतेय. त्याचीच सुरुवात आहे ही. गेल्या ४-५ वर्षांत पाहतोय मी.. मुंबई ला बरेच परप्रांतीय आणि आपले मराठी(भैय्ये) ही ‘बॉम्बे’ ‘बंबई’ बोलायला लागले आहेत… अरे आमच्या आईचं नाव मुंबई आहे.. जे मुंबादेवी वरुन पडलंय…असे आक्षेप घेतले की ही चित्रपट सृष्टीतली मंडळी गोलमोल स्पष्टीकरण देतील की ते अमुक-तमुक कारणामुळे आम्ही हे नाव दिलं.” शेवटी चित्रपटाच्या निर्मात्यांना इशारा देत ते म्हणाले की, “माझा या चित्रपटाच्या टीम ला विनंती वजा इशारा आहे की तुमच्या चित्रपटाचं नाव The Bombay Blood वरून The Mumbai Blood करा नाहीतर आम्ही मराठी माणसं झुरळं होऊन तुमचा बाजार उठवू…. मल्टीप्लेक्स मध्ये screens मिळाल्या नाही की कळेल…तुमचे चित्रपटावर गुंतवलेले कोट्यवधी रुपये शून्य झाले की मग रडू नका…”
एरा ऑफ लाईट फिल्म्स निर्मित द बॉम्बे ब्लड या इंग्रजी चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन गौरव हृषीकेश ठाकूर यांनी केलं आहे. यात अनेक जर्मन कलाकार असून मराठी मालिका-चित्रपट सृष्टीतील अभिनेता कश्यप परूळेकर यानेही यात भूमिका साकारली आहे. चित्रपटाचं चित्रीकरण जर्मनी व भारतात करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या नावासंबंधी उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वार्ताने चित्रपटाच्या टीम शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, अद्याप त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. मागील काही काळापासून मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटलेला पाहायला मिळतोय. त्यात मुंबईला बॉम्बे बोलण्यावरूनही अनेक ठिकाणी वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळालेली आहे. अशातच या चित्रपटाच्या नावावरून नव्या वादाला तोंड फुटल्याचे चित्र आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पहिल्या भारतीय-जर्मनी संयुक्त निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वाटेत अडथळे निर्माण झाले आहेत.
