काळ्या पैशांचा स्त्रोत पनवेल महानगरपालिकेच्या कंत्राटदार-अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याची शंका
पनवेल/नवी मुंबई, दि. ५: काळ्या पैशांचं बिंग कधी कुठे कसं फुटेल हे सांगता येत नाही. पनवेल येथे स्थावर मालमत्तेशी संबंधित एका व्यवहारात मालमत्ता विकत घेणारा आणि ती विकत घेऊन देणाऱ्या रिअल इस्टेट व्यावसायिकांमधील वादात लाखो रुपयांच्या काळ्या पैशांच बिंग फुटलंय. नवीन पनवेल Panvel येथे वास्तव्यास असलेल्या निलेश खेतले Nilesh Khetle यांनी याच परिसरात राहणारे अक्षय तांबोळी Akshay Tamboli यांना दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी दोन रिअल इस्टेट व्यावसायिकांच्या माध्यमातून सेक्टर – ११, नवीन पनवेल येथे एक व्यावसायिक गाळा दाखवला होता. त्यांनंतर निलेश यांनी अक्षय तांबोळी यांच्याकडे पुढची बोलणी कधी करायची यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी “माझे जिजाजी ऑस्ट्रेलियाला आहेत” तर कधी ते, “तिरुपती बालाजीला गेले आहेत, ते आले कि त्यांना गाळा दाखवू” अशी कारणे देत चालढकल केली. काही दिवसांनी तर त्यांनी फोनही उचलणे बंद केले. अचानक एक दिवस निलेश यांना सांगण्यात आले कि या गाळ्याचा व्यवहार मध्यस्थांना बाजूला करत १ कोटी ४ लाख रुपयांना जागा मालकासोबत परस्पर झाला आहे. हे ऐकताच निलेश यांना धक्का बसला कारण तांबोळी परिवारासोबत मागील अनेक वर्षांपासून चांगले संबंध असूनही त्यांनी आपली अशी फसवणूक केली. यानंतर काही दिवसांनी या व्यवहारातील मध्यस्थांनी त्यांना गाठले व गैरसमजातून उलट निलेश यांच्याकडेच कमिशन चे पैसे देण्यासाठी तगादा लावला. अखेर तुमच्यासोबत माझीही फसवणूक झाली असल्याचे सांगताच त्यांनाही धक्का बसला.
निलेश यांचे म्हणणे असे की, मी ऑगस्टच्या २ तारखेला हा गाळा अक्षय तांबोळी व त्यांच्या वडिलांना दाखवला आणि चक्क ५ दिवसांत म्हणजेच ७ ऑगस्ट २०२५ रोजी एकरकमी पैसे देत याचा व्यवहारही पूर्ण झाला. या संपूर्ण काळात अक्षय तांबोळी व त्यांच्या वडिलांनी धडधडीत खोटी कारणे सांगत आपली दिशाभूल केली. या प्रकरणी निलेश यांनी नुकतीच अक्षय संतोष तांबोळी व स्वाती संतोष तांबोळी यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे. परंतु, या प्रकरणाची खरी व काळी बाजू हि वेगळीच आहे. हि बाजू पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी व कंत्राटदार आणि त्यांचा भ्रष्टाचार या अंगाने जाणारी आहे असे प्रथमदर्शनी जाणवते. महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या सबंध प्रकरणातील २९ वर्षीय अक्षय तांबोळी हे जे पात्र आहे त्यांच्या परिवाराचा मूळ व्यवसाय भाकरी विक्रीचा आहे. तर मागील काही काळापासून अक्षय हे पनवेल महानगरपालिकेशी संबंधित कामांची कंत्राटं घेत आहेत अशी माहिती प्राप्त झाली. विवादित प्रकरणातील दुकानाच्या व्यवहाराची, नोंदणी कार्यालयामार्फत माहिती घेतली असता असे आढळले कि कागदोपत्री हा व्यवहार ५५ लाख रुपयांना झाला आहे तर तांबोळींच्या म्हणण्याप्रमाणे हा व्यवहार १ कोटी ४ लाख रुपयांना झाला आहे. मग, पहिलाच प्रश्न असा उपस्थित होतो की उर्वरित लाखो रुपयांची रोकड तांबोळी यांनी कोणत्या आधारावर मूळ मालकाला दिली? हि बेनामी रोकड नेमकी अक्षय तांबोळी यांची स्वतःची होती कि पनवेल महानगरपालिकेतील कोणा कंत्राटदार अथवा अधिकाऱ्याशी संबंधित होती? शिवाय हे ‘जिजाजी’ नामक पात्र नेमकं कोण आहे, या सर्व व्यवहाराशी त्याचा काय संबंध आहे? हे व असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात.
सध्या पनवेल महानगरपालिका हि भ्रष्टाचाराच्या किडीने पूर्णतः पोखरली असून त्याचे धक्के पनवेलकरांना रस्तोरस्ती बसत आहेत. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे पनवेलची जनता आधीच मेटाकुटीस आली आहे. त्यातून जर पालिकेतील अधिकारी – कंत्राटदारांच्या बेनामी पैशांनी अशा प्रकारे खुलेआम स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक होत असेल तर ही नक्कीच संतापजनक बाब आहे. हा संपूर्ण व्यवहार आता संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यामुळे या संबंध व्यवहाराची प्राप्तिकर विभाग, डीजीजीआय (DGGI) व राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत(ACB) तात्काळ चौकशी होणे व कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. शिवाय सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ‘ईडी’ ने पीएमएलए कायद्याअंतर्गत कारवाई करत या व्यवहारातील बेनामी पैशांचा स्रोत शोधायला हवा. नक्कीच याची पाळमुळं पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचतील.