बळवंत ने खोट्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे २००६ साली नोकरी मिळवल्याच्या आरोपात तथ्य असल्याचा चौकशी समितीचा निर्वाळा
पुणे, दि. २८: बनावट जात वैधता प्रमाणपत्राचा वापर करत नोकरी मिळवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. हि मंडळी आयुष्यभर आपलं बिंग फुटू नये याची पुरेपूर काळजी घेतात. पण चोरी ती चोरीच शेवटी, कधी न कधी याचा बोभाटा होतोच आणि चोर पकडला जातोच. आज पासून बरोबर तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र वार्ता ने पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राहुल भिमराव कोळी Rahul Bhimrao Koli उर्फ राहुल बळवंत Rahul Balwant यांच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणावर एका सविस्तर वृत्त अहवालामार्फत प्रकाश टाकला होता. यावेळी राहुल कोळी उर्फ राहुल बळवंत याने २००६ साली नोकरीवर रुजू होताना बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचे गंभीर आरोप याच महाविद्यालयाचे अधिव्याख्याता राजेंद्र ढवळे Rajendra Dhavle व सामाजिक कार्यकर्त्या व भाजयुमोच्या नेत्या मनीषा धारणे Manisha Dharne यांनी केले होते. यानंतर मनीषा धारणे यांनी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे व कला संचालनालयाकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीचा मनीषा धारणे यांनी न थकता, कधी मंत्रालयीन स्तरावर तर कधी कला संचालनालयाकडे पाठपुरावा केला. अखेर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्कालीन कला संचालक राजीव मिश्रा यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी चौकशी समिती गठीत केली. चौकशी समितीने केलेल्या तपासात अभिनव कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राहुल भिमराव कोळी उर्फ राहुल बळवंत यांनी २००६ साली नियुक्तीवेळी अनुसूचित जमातीचे खोटे जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचे निदर्शनास आले. शिवाय चौकशी समितीनेही राहुल कोळी उर्फ राहुल बळवंत ला त्याची बाजू मांडण्याची तसेच २००६ साली नियुक्ती समयी जमा केलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची वाजवी संधी दिली होती. परंतु, त्याने नियुक्तीवेळचे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. अखेर अहवाल प्राप्त झाल्यावर त्याची तात्काळ दखल घेत कला संचालनालयाचे नवनियुक्त कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी राहुल कोळी उर्फ राहुल बळवंत याची १८ जुलै २००६ रोजी सहाय्यक अधिव्याख्यातापदी नियुक्ती करण्यास दिलेली मान्यता रद्द केली.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने या प्रकरणाचा भांडाफोड करताना अधिव्याख्याता राजेंद्र ढवळे व मनीषा धारणे यांनी उपलब्ध केलेल्या कागदपत्रांचा सखोल अभ्यास केला होता. यावेळी असं आढळलं की, अभिनव कला महाविद्यालायचा निष्कासित प्रभारी प्राचार्य राहुल भिमराव बळवंत उर्फ राहुल कोळी याची १० ऑक्टोबर २००६ रोजी अनुसूचित जमाती प्रवर्ग (महादेव कोळी) अंतर्गत अभिनव कला महाविद्यालयाच्या सहाय्यक अध्यापक पदि नियुक्ती करण्यात आली होती. या पदासाठी जुलै २००६ साली निवड झाल्यानंतर, राज्याच्या कलासंचालनालयाद्वारे निर्गमित आदेशाप्रमाणे सहा महिन्यांच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र जर सादर केले तरच त्याला नियुक्ती पत्र मिळणार होते. अन्यथा त्याची नियुक्ती नियमाप्रमाणे रद्दबातल ठरणार होती. याच पार्श्वभूमीवर राहुल कोळी उर्फ राहुल बळवंत ने आपल्या नियुक्तीपूर्वी एक बनावट जात वैधता प्रमाणपत्र अभिनव महाविद्यालयास जमा केलं. आता इथे खरी गोम अशी आहे कि या घोटाळ्याचा भांडाफोड होण्यापूर्वी अभिनव कला महाविद्यालयाच्या रेकॉर्ड मध्ये राहुल भिमराव कोळी(बळवंत) याची दोन जात वैधता प्रमाणपत्र होती. त्यात हे एक जूनं बनावट प्रमाणपत्र जे एका दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे नोंद असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत मिळाली. याचसोबत तपासणी दिनांक २/५/२००९ रोजीचे असे दुसरे नवे प्रमाणपत्र रेकॉर्ड ला होते. जे वैध असल्याचे म्हणत कॉलेज प्रशासन राहुल बळवंत ला आजपर्यंत पाठीशी घालत आलेलं आहे
Crime! पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा मनीषा धारणे यांचा गंभीर आरोप
आता या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित होतात. जर राहुल कोळी उर्फ राहुल बळवंतची नियुक्ती २००६ साली झाली होती, तर २००९ सालचे प्रमाणपत्र मागाहून अभिनवच्या प्रशासनाने प्राचार्य राहुल कोळी/बळवंत याच्याकडून कोणत्या आधारावर जमा करून घेतले? अशी एकाच वेळी दोन-दोन प्रमाणपत्र आपल्या रेकॉर्डला आहेत हे आढळून आलं तरीही अभिनव कला महाविद्यालयाच्या प्रशासनाने तसेच भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाच्या अध्यक्ष, सचिव आदींनी राहुल कोळी उर्फ राहुल बळवंतची तात्काळ हकालपट्टी करत त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार का नाही दिली? याउलट सेवा ज्येष्ठतेनुसार अधिव्याख्याता राजेंद्र ढवळे यांना डावलून राहुल कोळी उर्फ राहुल बळवंत ला प्रभारी प्राचार्यपदी पदोन्नती देण्यात आली. या साऱ्याची उत्तरं भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाचे सचिव पुष्कराज पाठक यांनी द्यायला हवीत असे मनीषा धारणे यांचे म्हणणे आहे.
“दबाव, तरीही मी पुरून उरले” – मनीषा धारणे
राहुल बळवंतच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात अधिव्याख्याता राजेंद्र ढवळे यांनी एका जागल्याची(Whistle Blower) भूमिका निभावत सर्व तपशील महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाला उपलब्ध करून दिले. या नंतर कोणत्याही अमिषाला बळी न पडता कोणतीही भिडभड न बाळगता मनीषा धारणे यांनी अखेर पर्यंत प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला. भारतीय जनता पक्ष युवती मोर्चाच्या पुणे शहर अध्यक्ष असलेल्या मनीषा धारणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून मागील १५ वर्षांपासून भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाच्या गैरकारभाराबाबत आवाज उठवत आलेल्या आहेत व अद्यापही त्यांचा लढा चालू आहे. टीम महाराष्ट्र वार्ताला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या कि, “या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यावर आम्ही तसेच कला संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही माघार घ्यावी यासाठी दबाव तंत्राचा एक भाग म्हणून राहुल भिमराव कोळी उर्फ राहुल बळवंत याने नीचतम पातळी गाठली होती. काही तोतया पत्रकारांमार्फत फेक न्युज पसरवत राहुल बळवंत ने माझे तसेच कलासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. ज्या साऱ्याला मी पुरून उरले. मी लढवैय्यी आहे. अशा भेकाडांना घाबरणारी नाही.
पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या पुष्कराज पाठक Pushakaraj Pathak सह एकूण १० आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे सर यांनी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता राहुल बळवंतवर कारवाई केली यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. त्याचसोबत असत्याविरुद्धच्या या लढाईत मागील तब्बल तीन वर्षांपासून प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या माजी कलासंचालक राजीव मिश्रा सर,उपसंचालक विनोद धांडगे सर व इतर अधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच”. पुढे त्या म्हणाल्या कि, “अधिव्याख्याता श्री. राजेंद्र ढवळे सरांनाही विनयभंगाच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जी जी मंडळी भारतीय कला प्रसारिणी सभा न्यास व त्याच्याशी संबंधित भारतीय कला प्रसारिणी सभेचे घोटाळे उघड करतात त्यांना एकतर बदनाम केलं जातंय किंवा कटकारस्थान रचून खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय. पण अखेर विजय सत्याचाच होतो.”
राहुल कोळी उर्फ राहुल बळवंत वर संस्था स्तरावर कारवाई करण्याचे जे आदेश कला संचालकांनी दिले आहेत त्याला अभिनव कला महाविद्यालयाने गांभीर्याने घेतल्याचे अद्यापतरी दिसत नाही. एवढ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी फक्त वेतन थांबवून भागणार नाही. तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे. अभिनवचं प्रशासन अजूनही बळवंत ला पाठीशी घालतंय कि काय अशी दाट शंका येतेय. यात राहुल बळवंतच्या घोटाळ्याकडे कानाडोळा करणाऱ्या भारतीय कला प्रसारिणी सभेवर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्याशिवाय राज्यातील संस्थाचालकरुपी मोकाट सुटलेल्या वळूंवर वेसण बसणार नाही. याबाबत नवनियुक्त कला संचालक डॉ. किशोर इंगळे कठोर भूमिका घेतात का हे पाहणं लक्षणीय ठरेल.
