आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई: महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचा आकस्मिकता निधी हा मुंबई आकस्मिकता नियम, 1956 अन्वये स्थापन करण्यात आला आहे. त्याची कायमस्वरुपी मर्यादा 150 कोटी आहे. या कायमस्वरुपी मर्यादेत तत्कालिक कारणांमुळे वेळोवेळी तात्पुरती वाढ करावी लागते. गेल्या खरीप हंगामात राज्यातील परतीचा अवकाळी पाऊस तसेच क्यार व महा वादळामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मुख्यत:भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर,कापूस, भाजीपाला, फळपिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याकरीता 5 हजार कोटी व न्यायालयीन प्रकरणांसाठी 350 कोटी इतका निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
