“शिवसैनिक सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी पाठीत खंजीर खुपसत नाही”: सुधीर मुनगंटीवार यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
मुंबई: दुसरा पर्याय उपलब्ध असताना आम्ही युती तोडण्याचं पाप करणार नाही ही उद्धव ठाकरे यांची भूमिका २४ ऑक्टोबर पासून आजपर्यंत आहे असे म्हणत संजय राऊत यांनी मतोश्रीवरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत झालेल्या काही मुद्द्यांवर माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
यावेळी संजय राऊत रोजच्यापेक्षा काहीसे जास्त आक्रमक वाटले. सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिवसैनिक संबोधल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, “शिवसैनिक मुळात खोटं बोलत नाही, शिवसैनिक दिलेल्या शब्दाला जागतो, शिवसैनिक वचनाला जागतो.” पुढे भाजपवर बोचरी टीका करत ते म्हणाले की शिवसैनिक सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी पाठीत खंजीर खुपसत नाही.
सरकार स्थापनेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप ला बहुमत मिळवता येत नाहीये. तसेच ते महाराष्ट्रावर राष्ट्रपती शासन जबरदस्तीने थोपवू इच्छितात. हा राज्यातील जनतेचा अपमान आहे.” भाजपला संबोधून ते पुढे म्हणाले की, “तुम्ही सांगा की आम्ही(भाजप) विरोधीपक्षात बसू तसेच तुम्ही राष्ट्रपती शासन लावून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहात.”
