गोपनीय कागदपत्रे, कार्यालयीन संदेश आणि संवेदनशील माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाण्याची शक्यता; अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश
नवी दिल्ली, दि. २४ : शासकीय कार्यालयांमधील संगणकांवर व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना होणारी छोटीशी निष्काळजीदेखील मोठ्या सायबर सुरक्षेच्या संकटाला निमंत्रण देऊ शकते. या माध्यमातून सायबर गुन्हेगारांना शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवता येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः कार्यालयीन गोपनीय माहिती, प्रशासकीय कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित तपशील धोक्यात येऊ शकतात. या संभाव्य धोक्याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने शासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने व्हॉट्सॲप वेबच्या वापराशी संबंधित सुरक्षेच्या संभाव्य त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. संगणकावर एकदा सुरू केलेले लॉगिन सत्र सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात गेल्यास त्याचा वापर करून संबंधित खात्यातील माहिती मिळवली जाऊ शकते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये या सुविधेचा वापर करताना विशेष दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
व्हॉट्सॲप खात्याचा ताबा मिळाल्यास काय होऊ शकते?
व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर अनधिकृत नियंत्रण मिळवण्यात सायबर गुन्हेगार यशस्वी झाल्यास संबंधित वापरकर्त्याच्या खात्यातील संभाषणे आणि संदेश त्यांना पाहता येऊ शकतात. इतकेच नव्हे, तर संबंधित व्यक्तीच्या नावाने इतरांना संदेश पाठवणे, संपर्क क्रमांकांची माहिती मिळवणे आणि विविध समूहांमधील संवाद वाचणेही शक्य होऊ शकते.
अशा प्रकारे एखाद्या शासकीय अधिकाऱ्याच्या खात्याचा वापर करून त्यांची ओळख धारण केली जाऊ शकते. त्याआधारे सहकारी अधिकारी, कर्मचारी किंवा इतर संबंधित व्यक्तींकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आर्थिक फसवणूक आणि संदेशांच्या माध्यमातून माहिती चोरण्याचे प्रकारही घडू शकतात.
गोपनीय कागदपत्रांसाठी व्हॉट्सॲप वेबचा वापर टाळा
शासकीय कामकाजाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबवरून करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासकीय नोंदी, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि कार्यालयीन कामाशी संबंधित महत्त्वाची माहिती या माध्यमातून पाठवणे टाळणे आवश्यक आहे.
कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेब सुरू केल्यानंतर लॉगिन सत्र तसेच ठेवण्याची सवयही धोकादायक ठरू शकते. काम पूर्ण झाल्यावर संबंधित खात्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणच्या संगणकांवरून किंवा सायबर कॅफे, हॉटेलमधील व्यावसायिक केंद्र आणि अन्य अविश्वसनीय संगणकांवरून या सुविधेचा वापर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
खात्यातील संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष नको
आपल्या खात्यातून स्वतःच्या नकळत संदेश पाठवले जात असल्याचे आढळणे, संपर्कातील व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्याच्या वापरामध्ये विचित्र बदल दिसणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची चिन्हे असू शकतात.
अशा घटना निदर्शनास आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक सुरक्षा उपाय करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कार्यालयीन संगणकांमधील कार्यप्रणाली, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा यंत्रणा अद्ययावत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
अनोळखी स्रोतांकडून आलेल्या फाइल्स, संशयास्पद डाउनलोड आणि विनापरवाना किंवा बदल केलेली संगणकीय प्रणाली उघडणे टाळावे. अशा फाइल्सच्या माध्यमातून संगणकांमध्ये घातक प्रणाली प्रवेश करण्याचा धोका असू शकतो.
शासकीय यंत्रणांसाठी सायबर सुरक्षेचे आव्हान
डिजिटल माध्यमांद्वारे कार्यालयीन कामकाज आणि संवाद वाढत असताना माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा बनला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या खात्याचा अनधिकृत वापर झाल्यास त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरता मर्यादित न राहता कार्यालयीन संवाद आणि माहितीच्या गोपनीयतेवरही होऊ शकतो.
त्यामुळे व्हॉट्सॲप वेब वापरताना लॉगिन सत्राची सुरक्षितता, काम संपल्यानंतर लॉगआऊट करणे आणि संवेदनशील माहितीची देवाणघेवाण टाळणे या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गृह मंत्रालयाच्या या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे शासकीय कार्यालयांमधील डिजिटल संवादाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

