पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंगसाठी प्रथमच प्रवेश परीक्षा; पीसीएमची पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिलदरम्यान
मुंबई, दि. १७ : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षात अधिक संधी मिळणार आहेत. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) एकूण २१ प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, यंदा ११ अभ्यासक्रमांसाठी दोन स्वतंत्र परीक्षांचे आयोजन केले जाणार असून, विद्यार्थ्यांना मिळालेल्या दोन गुणांपैकी अधिक पर्सेंटाइल असलेले गुण प्रवेशासाठी विचारात घेतले जाणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली.
यंदाच्या परीक्षांमध्ये तीन अभ्यासक्रमांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. पदव्युत्तर पदविका व्यवस्थापन (पीजीडीएम), पदव्युत्तर प्रमाणपत्र व्यवस्थापन (पीजीसीएम) आणि सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र (जीएनएम नर्सिंग) या अभ्यासक्रमांसाठी राज्यात पहिल्यांदाच सीईटी घेतली जाणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये परीक्षांचे सत्र सुरू होऊन १० जूनपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
११ अभ्यासक्रमांसाठी दोनदा परीक्षा देण्याची संधी
विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतील कामगिरी सुधारण्याची आणखी एक संधी मिळावी, या उद्देशाने दोन वेळा सीईटी घेण्याचा निर्णय विस्तारण्यात आला आहे. यापूर्वी पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांसाठीच दोन परीक्षा घेतल्या जात होत्या. आता त्यात आणखी आठ अभ्यासक्रमांची भर पडली आहे.
त्यानुसार पुढील ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी होणार आहे.
- पीसीएम समूह
- पीसीबी समूह
- एमबीए/एमएमएस
- पीजीडीएम
- पीजीसीएम
- पाच वर्षीय एलएलबी
- बीएचएमसीटी
- बीसीए
- बीबीए
- बीएमएस
- बीबीएम
या व्यवस्थेत पहिली प्रवेश परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. दुसऱ्या परीक्षेला बसायचे की नाही, याचा निर्णय विद्यार्थी घेऊ शकतील. दोन्ही परीक्षा दिल्यास ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल मिळतील, तेच प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
कोणत्या अभ्यासक्रमाची परीक्षा कधी?
दोन वेळा परीक्षा होणाऱ्या अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
| अभ्यासक्रम | पहिली परीक्षा | दुसरी परीक्षा |
|---|---|---|
| एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम | २८ ते ३० जानेवारी २०२७ | १ ते ३ एप्रिल २०२७ |
| पाच वर्षीय एलएलबी | २८ ते २९ मार्च २०२७ | २४ मे २०२७ |
| पीसीबी समूह | ८ ते १३ एप्रिल २०२७ | ६ ते ८ मे २०२७ |
| पीसीएम समूह | १६ ते २६ एप्रिल २०२७ | १० ते १५ मे २०२७ |
| बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम | २८ ते ३० एप्रिल २०२७ | २७ ते २८ मे २०२७ |
अन्य सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक
उर्वरित अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठीही तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एम.एचएमसीटीची परीक्षा २४ मार्च, एमसीएची २७ मार्च आणि कला शिक्षण अभ्यासक्रमाची परीक्षा ११ एप्रिल २०२७ रोजी होणार आहे.
बी.डिझाईनची परीक्षा १८ एप्रिल, तर तीन वर्षीय एलएलबीची परीक्षा ४ आणि ५ मे रोजी आयोजित केली जाणार आहे. डीपीएन/पीएचएनची परीक्षा १८ मे, नर्सिंगची १८ आणि १९ मे, तर जीएनएम नर्सिंगची परीक्षा २१ आणि २२ मे रोजी होईल.
एमपीएडची परीक्षा ५ जून, एमएडची ६ जून, तर बीएड (जनरल व स्पेशल), बीएड (ईएलसीटी) आणि बीपीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ ते १० जून २०२७ या कालावधीत पार पडतील.

यंदा तीन अभ्यासक्रमांसाठी पहिल्यांदाच सीईटी
पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यापूर्वी राज्याच्या सीईटी वेळापत्रकात स्वतंत्र परीक्षा नव्हती. शासनाच्या निर्देशानुसार आता या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
यातील पीजीडीएम आणि पीजीसीएम या दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षा एमबीए सीईटीसोबतच आयोजित केल्या जातील. या दोन अभ्यासक्रमांसाठीही विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
मागील वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
२०२६ मध्ये राज्यात २० सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले होते.
राष्ट्रीय स्तरावर जेईई मुख्य परीक्षा दोन वेळा घेतली जाते. त्याच धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांनाही कामगिरी सुधारण्यासाठी अतिरिक्त संधी मिळावी, या विचारातून महाराष्ट्रातही दोन परीक्षांची पद्धत सुरू करण्यात आली. मागील वर्षी तीन अभ्यासक्रमांपुरती मर्यादित असलेली ही सुविधा आता ११ अभ्यासक्रमांपर्यंत विस्तारण्यात आली आहे.
तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएडची परीक्षा यंदा नाही
यंदाच्या वेळापत्रकातून तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी वगळण्यात आली आहे. राज्यात हा अभ्यासक्रम केवळ एका संस्थेत सुरू असून, एकूण ५५ जागांपैकी यंदा फक्त १२ जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे, एमपीएड, एमएड आणि बीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकडून करण्यात आली होती. त्यानुसार या परीक्षांचे आयोजन जून महिन्यात करण्यात आले आहे.
सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या तारखा सध्या संभाव्य स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थींनी अर्ज प्रक्रिया, अंतिम वेळापत्रक आणि परीक्षेसंदर्भातील बदलांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
