‘एनडीएसोबत जाण्याचा प्रश्नच नाही’; दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत यापुढे या विषयावर बोलणार नसल्याचेही केले स्पष्ट
मुंबई, दि. १४ : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आता स्पष्टपणे नकार दिला आहे. अजित पवार हयात असताना या विषयावर चर्चा झाली होती; मात्र त्यांच्या निधनानंतर आपल्या पक्षात विलीनीकरणाचा विषय संपल्याचे सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा किंवा सत्तेत सहभागी होण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि चर्चांमुळे विलीनीकरणाच्या शक्यतेबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू होते. या चर्चांमध्ये दोन्ही पक्षांकडून वेगवेगळी विधानेही केली जात होती. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडली.
अजित पवार असताना चर्चा; निधनानंतर विषय संपल्याचे विधान
विलीनीकरणाच्या चर्चांबाबत नाराजी व्यक्त करताना सुळे म्हणाल्या, “माझा भाऊ होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती.” अजित पवार यांच्यासोबत या संदर्भात चर्चा झाली होती आणि त्यासाठी तारीखही निश्चित झाली होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या मनात आणि पक्षात या विषयाला पूर्णविराम मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या वेळी संघटनेतील पदाधिकाऱ्यांशीही संवाद झाला होता. त्या संदर्भातील व्हिडिओ प्रसारित झाल्याचा उल्लेखही सुळे यांनी केला. विलीनीकरणाबाबत पुढे जाण्याचे जे काही ठरले होते, ते अजित पवार यांच्यासोबतच ठरले होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
एनडीएसोबत जाण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीएमधील सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चाही सुळे यांनी फेटाळून लावल्या. एनडीएसोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या पक्षाच्या सत्तेत सहभागी होण्याचा विषयही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार गटाकडून विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. यासंदर्भात आपल्याला फोन किंवा संदेशही मिळालेला नसल्याचे सुळे यांनी सांगितले. दुसऱ्या गटात काय चर्चा सुरू आहेत, यावर प्रतिक्रिया देण्याची आपली भूमिका नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
यापुढे विलीनीकरणाच्या विषयावर बोलणार नाही
विलीनीकरणाच्या चर्चांवर वारंवार प्रश्न विचारले जात असल्याबद्दल सुळे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. या विषयावर आता पुरेसे बोलून झाले असून, यापुढे आपण त्यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी या विषयावरील प्रश्न आजच विचारून घ्यावेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
अजित पवार यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याबाबत बोलताना सुळे यांनी भावनिक भूमिका व्यक्त केली. “माझं आणि माझ्या भावाचं नात जवळच होतं तो ओलावा कायम राहील”, असे त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या बाजूने स्पष्ट नकार मिळाला आहे. तसेच एनडीएसोबत जाण्याच्या शक्यतेलाही त्यांनी नाकारल्याने या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट झाली आहे.

