आधार प्रमाणीकरणानंतर मिळणार लाभ; आतापर्यंत २४.६७ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध
मुंबई, दि. १३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील आणखी ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश पात्र लाभार्थ्यांच्या तिसऱ्या यादीत करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या कर्जखात्यावरील थकबाकीची पडताळणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे लागणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पात्र शेतकऱ्यांना ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेतून पात्र पीककर्जदारांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या काळात वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत राहिलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे यासाठी विचारात घेतली जात आहेत. पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही योजनेत समावेश आहे.
आतापर्यंत २४.६७ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर
योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकांकडून मिळालेली कर्जखात्यांची माहिती संगणकीय पद्धतीने तपासली जात आहे. यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली असून, योजनेच्या संकेतस्थळावर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
या प्रक्रियेतून २४ जुलै २०२६ रोजी पहिल्या टप्प्यात १६.९६ लाख शेतकऱ्यांची, ११ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात ४.२० लाख शेतकऱ्यांची, तर १२ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या टप्प्यात ३.५१ लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. तिन्ही याद्यांमधून आतापर्यंत एकूण २४.६७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध झाली आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक शेतकरी
तिसऱ्या यादीत विभागनिहाय समाविष्ट शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :
- छत्रपती संभाजीनगर विभाग : २ लाख ६ हजार ४५०
- अमरावती विभाग : ८५ हजार ७६
- नागपूर विभाग : ३० हजार ७३८
- नाशिक विभाग : १४ हजार २४४
- पुणे विभाग : ११ हजार ९२८
- कोकण विभाग : २ हजार ७५६
या लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आपले नाव यादीत आहे की नाही, याची स्थानिक पातळीवर पडताळणी करता येईल.
थकबाकी तपासूनच आधार प्रमाणीकरण करा
यादीत नमूद केलेली कर्जाची थकबाकी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ केले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडून आपल्या कर्जखात्याची रक्कम तपासून घ्यावी. त्यानंतर जवळच्या आपले सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांच्या यादीतील काही शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक केली जाणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनीही आपल्या खात्याची माहिती तपासून पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

मृत लाभार्थी तसेच वयस्कर असल्याने किंवा बोटांचे ठसे नोंदवले जात नसल्याने आधार प्रमाणीकरणात अडचणी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही पर्यायी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील मानक कार्यप्रणाली १९ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आली होती.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर मंजूर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांसाठी आता कर्जखात्याची पडताळणी आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
