१९ सप्टेंबरला मुंबईत पोहोचून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार; शरण न जाण्याचा इशारा
अंतरवाली सराटी, दि. १३ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघण्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीतून राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याविरोधात कट रचला जात असल्याचा दावा करत, मुंबईतील आंदोलनादरम्यान आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कोणत्याही दबावाला न जुमानता मुंबई गाठून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील मराठा मोर्चात गोंधळ निर्माण करण्यासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्या समर्थकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनादरम्यान आपल्याला लक्ष्य केले जाऊ शकते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. “मोर्चात गोळ्या घालायचा डाव आहे. मराठ्यांना न मारता फक्त मला शूट करणार आहेत.” असा दावा त्यांनी केला.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील मराठा आमदारांकडून काही कार्यकर्त्यांना मोर्चापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात असल्याचेही जरांगे यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारच्या दबावामुळे आपण आंदोलनापासून मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पण मी शरण येणार नाही,” असे सांगत त्यांनी समर्थकांनाही आपल्या भूमिकेबाबत भावनिक आवाहन केले. “मराठ्यांनो तुम्ही मला साथ द्यायची नसेल तर नका देऊ. तुम्हाला भीती असेल तर घरात बसा. आता फक्त मुंबईला जाताना या आणि त्यानंतर माझ्या अंत्ययात्रेला या,” असे ते म्हणाले.
१९ सप्टेंबरला मुंबईत पोहोचण्याचा निर्धार
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी १९ सप्टेंबरला मुंबईत दाखल होऊन सकाळी १० वाजता आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याचे नियोजन असल्याचे जरांगे यांनी सांगितले. या आंदोलनासाठी आवश्यक परवानगी मिळावी म्हणून अर्ज करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
“आपण मुंबईला जाणार, आपण कायद्याला मानतो. त्यामुळे आझाद मैदानावरील उपोषणाच्या परवानगीसाठी आपण अर्ज केला आहे. परवानगी द्यायची की नाही हे देवेंद्र फडणीस साहेबांनी ठरवावे.” असे त्यांनी म्हटले.
मुंबईतील आंदोलनासाठी प्रशासनाने अटी किंवा नियम घातले तरी त्यांचा विचार केला जाईल, असे संकेत देत त्यांनी आंदोलनाचा कायदेशीर मार्ग कायम ठेवण्याची भूमिका मांडली. “माझी काय चूक, मी कायद्याचे उल्लंघन करत आहे का? तुम्ही अटीशर्ती घालायच्या असतील तर घाला.” असे जरांगे म्हणाले.
बावनकुळे यांच्यावरही टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत जरांगे यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. “चंद्रशेखर बावनकुळे हे बाईच्या आडून वार करतात. नागाच्या शेपटावर पाय दिल्यावर आम्हाला दाखवावे लागेल.” असे त्यांनी म्हटले.
याचवेळी राज्यातील काही मंत्र्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा इशाराही जरांगे यांनी दिला. “दुसऱ्या राज्यापर्यंत आमचे हात आहेत, आमचे पण केंद्रात मंत्री आहेत. इथले चार दोन मंत्री आम्ही अडचणीत आणणार,” असे ते म्हणाले.
शिंदेंवरील विश्वासाचा दाखला; फडणवीसांबाबतही सवाल
मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील पूर्वीच्या घडामोडींचा संदर्भ देताना जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासाचा उल्लेख केला. वाशी येथून शासन निर्णय घेऊन परतल्याच्या प्रसंगाची आठवण करून देत, त्या वेळी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.
“एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून वाशीमधून GR घेऊन आलो होतो. तेव्हा शिंदे साहेबांचा सन्मान केला तेव्हा मराठे गोड लागत होते.” असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, फडणवीस आणि आपल्यातील राजकीय संबंध भविष्यात बदलल्यास त्याचा परिणाम शिंदे गटावर काय होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “समजा माझं आणि फडणवीस याचं चांगले झाले तर तुमचे काय होईल,” असा सवाल जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना केला.
फडणवीस यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात, असा दावा करत त्यांनी त्याचा इतर नेत्यांवर होणारा परिणामही अधोरेखित केला. “फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य करुन बाजी मारली तर मग मराठ्यांचं आणि फडणवीस यांचं चांगलं होईल, मग बाकीच्यांचं काय होणार?” असे ते म्हणाले.
‘मरण पत्कारेन, पण शरण येणार नाही’
आपल्याविरोधात चौकशा किंवा अन्य दबावाचे मार्ग वापरले गेले तरी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. “आणखीनही सांगतो चौकशा लावून मी शरण येणार नाही. मरण पत्कारेन, पण तुम्हाला शरण येणार नाही.” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबईतील आंदोलनादरम्यान आपल्यावर हल्ला झाल्यास त्याची जबाबदारीही अप्रत्यक्षपणे संबंधित यंत्रणांवर येईल, असा सूर त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला. “मुंबईत स्टेजवर रक्त सांडेन,” असेही जरांगे यांनी म्हटले.
दरम्यान, मुंबईतील प्रस्तावित उपोषणासाठी परवानगी, आंदोलनाच्या अटी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे आगामी काळात प्रशासनासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोपांवर संबंधितांकडून अधिकृत भूमिका काय मांडली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
* संग्रहित छायाचित्र
