कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण; जीवनावश्यक सेवांच्या वाहनांना सूट
मुंबई, दि. ११ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक एकूण वजनक्षमता असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर टप्प्याटप्प्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्णयाचा उद्देश महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याचा आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीच्या दिवसांपासूनच या निर्बंधांची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत ट्रक, मल्टिअॅक्सल वाहने, ट्रेलर, लॉरी आणि तत्सम १६ टनांपेक्षा अधिक एकूण वजन असलेल्या वाहनांना महामार्गावरून प्रवास करता येणार नाही.
विसर्जनाच्या टप्प्यानुसार वेळापत्रक
पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर होणाऱ्या परतीच्या प्रवासासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत निर्बंध लागू राहतील. सात दिवसांच्या गणपती तसेच गौरी-गणपती विसर्जनानिमित्त १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल. अनंत चतुर्दशीच्या विसर्जनावेळी आणि त्यानंतरच्या परतीच्या वाहतुकीसाठी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. अधिकृत आदेशानुसार वाहनाची नोंदणीकृत वजनक्षमता निश्चित करताना मालासह वाहनाचे एकूण वजन अर्थात टोटल ग्रॉस व्हेईकल वेट ग्राह्य धरले जाणार आहे.
कोणत्या वाहनांना सूट?
या निर्बंधातून जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना वगळण्यात आले आहे. त्यात जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला तसेच अन्य नाशवंत वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही या बंदीपासून सूट देण्यात आली आहे.
महामार्गाच्या कामांसाठीही विशेष तरतूद
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक साहित्य व यंत्रसामग्री वाहून नेणाऱ्या वाहनांनाही निर्बंधातून वगळण्यात आले आहे. अशा वाहनांना संबंधित वाहतूक विभाग किंवा महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र दिले जाणार आहे.
परिस्थितीनुसार निर्णयाचा अधिकार
वाहतुकीची प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आवश्यकतेनुसार अवजड वाहनांवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेऊ शकतील. तसेच जेएनपीटी आणि जयगड बंदरांमधील आयात-निर्यात वाहतूक अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना परिवहन विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिल्या आहेत.

