अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; माहिममध्येही घोषणाबाजी, पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
मुंबई, दि. १ : पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयातील एका छायाचित्रावरून सुरू झालेला वाद आता थेट मनसे आणि भाजपमधील संघर्षाचे कारण ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसोबत लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हटवण्यात आल्यानंतर भाजप युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली. अमित ठाकरे यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्तेही राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने जमले.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील माहिम आणि राज ठाकरे यांच्या निवासस्थानाचा परिसर राजकीय घोषणांनी दणाणून गेला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांना मनसैनिकांकडून प्रसाद मिळाल्याचे स्वतः भाजप कार्यकर्त्यांनी कबूल केले.
पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे गेले होते. महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला दिसला. यावेळी अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत का लावण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तो फोटो तेथून हटवला.
या घटनेनंतर अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या दोन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग चढला आणि भाजपकडून मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली.
भाजप युवा मोर्चाचा शिवतीर्थवर आंदोलनाचा इशारा
अमित ठाकरे यांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाने राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्तेही शिवतीर्थ परिसरात दाखल झाले.
मनसे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे आणि अविनाश जाधव यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. भाजपचे कार्यकर्ते येथे आल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्याची भूमिका संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली.
माहिममध्येही दोन्ही गटांमध्ये तणाव
दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक माहिममध्ये पोहोचल्यानंतर अमित ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही तेथे जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना वेगळे केले. भाजप कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेत भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अमित ठाकरे यांनी यापूर्वी माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
शिवतीर्थ परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शिवतीर्थ परिसरात पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात आली असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
पुण्यातील महाविद्यालयातील छायाचित्र हटवण्याच्या घटनेपासून सुरू झालेला हा वाद आता मुंबईतील राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे. एका बाजूला भाजप युवा मोर्चाकडून अमित ठाकरे यांच्या कृतीचा निषेध केला जात असताना दुसरीकडे मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतल्याने आगामी काळात या प्रकरणावरून दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
