व्यावसायिक वाहनचालकांच्या तपासणीला वेग; आतापर्यंत ४ हजार २२२ चालकांची तपासणी, १ हजार २६८ जणांना नोटिसा
मुंबई, दि. २० : प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करणाऱ्या रिक्षा आणि इतर व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान आहे की नाही, याची राज्यभर तपासणी सुरू झाली आहे. तपासणीत मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळलेल्या चालकांना सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जात आहे. या कालावधीत अपेक्षित ज्ञान संपादन न केल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ४ हजार २२२ चालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार २६८ चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान अपुरे असल्याचे आढळल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रात ६०४ चालकांना नोटिसा
मुंबई महानगर क्षेत्रातील तपासणीत ३ हजार ९९५ वाहनचालकांची भाषा-कौशल्याच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. यामध्ये ६०४ चालकांना व्यावहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित सर्व चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील राज्यातील उर्वरित तपासणीत आतापर्यंत ४ हजार २२२ चालकांची तपासणी झाली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत तपासणी मोहीम
ही राज्यव्यापी तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. तपासणीच्या वेळी चालक प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक मराठी संवाद करू शकतो की नाही, याचा आढावा घेतला जाणार आहे.
मराठीचे ज्ञान अपुरे असलेल्या चालकांना तत्काळ बॅज निलंबनाची कारवाई न करता प्रथम स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जात आहे. मात्र, दिलेल्या कालावधीनंतरही आवश्यक निकष पूर्ण न केल्यास बॅज निलंबित करण्याची पुढील कारवाई केली जाणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना म्हटले, “महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,”
प्रवाशांशी थेट संपर्क असलेल्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी भाषिक संवाद सुलभ व्हावा, या उद्देशाने ही तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या नोटीस मिळालेल्या चालकांसमोर एका महिन्यात आवश्यक व्यावहारिक मराठी आत्मसात करण्याचे आव्हान आहे.
दरम्यान, ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या तपासणीत आणखी किती चालक या निकषात अपात्र ठरतात आणि त्यानंतर किती जणांवर बॅज निलंबनाची कारवाई होते, याकडे आता परिवहन विभागासह वाहनचालकांचेही लक्ष लागले आहे.

