महायुती सरकारचे मानले आभार; प्रत्येक तालुका, गाव आणि नागरिकाच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन
रायगड, दि. १९ : रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोगावले यांच्यावर आता संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आली असून, प्रत्येक तालुका आणि गावापर्यंत विकासाची कामे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच महायुती सरकारचे गोगावले यांनी आभार मानले. मंत्री म्हणून आतापर्यंत पार पाडलेल्या जबाबदारीपेक्षा पालकमंत्री म्हणून अधिक व्यापक भूमिका बजावावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रायगडशी असलेले आपले नाते अधोरेखित करताना गोगावले यांनी हा जिल्हा आपली मायभूमी आणि कर्मभूमी असल्याचे सांगितले. रायगडच्या जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली असून, त्या विश्वासाचे ऋण विकासकामांच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रत्येक तालुका आणि गावाच्या विकासावर भर
महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना आता संपूर्ण रायगडची जबाबदारी मिळाल्याने जिल्ह्याच्या सर्व भागांना समान महत्त्व देण्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीचा भूमिपुत्र आणि शिवरायांचा मावळा म्हणून रायगडच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि नागरिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
पालकमंत्रिपद हे केवळ प्रशासकीय पद म्हणून न पाहता जनतेशी अधिक जवळून काम करण्याची संधी म्हणून त्याकडे पाहत असल्याचे गोगावले यांनी सांगितले. या जबाबदारीच्या माध्यमातून रायगडच्या विकासाला अधिक गती देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
महाड-माणगाव-पोलादपूरच्या जनतेचेही मानले आभार
आपल्या राजकीय प्रवासात महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघातील नागरिक तसेच शिवसैनिकांनी दिलेल्या पाठिंब्याचा गोगावले यांनी विशेष उल्लेख केला. आतापर्यंत मिळालेली साथ आणि आशीर्वाद आता संपूर्ण रायगडच्या विकासासाठी उपयोगी ठरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांना समन्वयाने पुढे नेणे, विविध भागांतील प्रश्नांवर लक्ष देणे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबत काम करणे, याला त्यांच्या पुढील कार्यकाळात महत्त्व राहणार आहे.
पालकमंत्रिपदामुळे जबाबदारी वाढली असली तरी रायगडच्या जनतेसाठी काम करण्याची मोठी संधी मिळाल्याची भावना गोगावले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नव्या जबाबदारीतून रायगडच्या विकासासाठी त्यांच्या कार्यपद्धतीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

