६४ लाख ९१ हजारांहून अधिक कार्डे सक्रिय; १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड अनिवार्य
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या डिजिटल प्रवासाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, एनसीएमसी स्मार्टकार्डसाठी राज्यभरात आतापर्यंत १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे सक्रिय झाली आहेत. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटीच्या तिकीट व्यवहारात रोख रकमेवरील अवलंबित्व कमी करून प्रवास अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने एनसीएमसी स्मार्टकार्डची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सध्या या उपक्रमात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
या तीनही प्रवर्गांसाठी १ सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित पात्र प्रवाशांनी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करून कार्ड मिळवावे, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
१५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांची नोंदणी
स्मार्टकार्डच्या पुढील टप्प्यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. १५ ऑगस्टपासून राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्टकार्ड नोंदणी सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी स्वतंत्रपणे केंद्र शोधण्याची आवश्यकता राहणार नाही. एसटी महामंडळाचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनधिकृत व्यक्ती किंवा ठिकाणी कार्ड नोंदणी करू नये, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांना एनसीएमसी स्मार्टकार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंटच्या माध्यमातून मिळणार आहे. कार्डमध्ये रक्कम भरण्याची अर्थात पुनर्भरणाची सुविधाही याच अधिकृत माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डिजिटल सुविधांमुळे एसटी प्रवासात बदल
एनसीएमसी स्मार्टकार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सोपे आणि रोखरहित करण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः सवलतीच्या प्रवासासाठी पात्र असलेल्या प्रवाशांना स्मार्टकार्डच्या माध्यमातून व्यवहार अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या ‘लालपरी’चा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. NCMC स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवितो. भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचविणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
राज्यातील एनसीएमसी स्मार्टकार्ड नोंदणीचा वाढता आकडा पाहता, एसटीच्या पारंपरिक तिकीट व्यवस्थेतून अधिक डिजिटल व्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. आता १ सप्टेंबरच्या अनिवार्यतेपूर्वी पात्र महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी पूर्ण करण्याचे आव्हान एसटी महामंडळासमोर राहणार आहे.

