जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २ कोटी १२ लाख १८ हजार रुपयांची तरतूद; महिला सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त होणार अधिक गतिमान
सांगली, दि. १० : शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या महिला आणि किशोरवयीन मुलींना सुरक्षित व आवश्यक सुविधा मिळाव्यात, तसेच महिला सुरक्षेच्या तक्रारींवर पोलिसांना अधिक वेगाने प्रतिसाद देता यावा, यासाठी सांगली जिल्ह्यात दोन महत्त्वाचे उपक्रम आकाराला आले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या २० हिरकणी कक्षांचे प्रातिनिधिक लोकार्पण करण्यात आले असून, महिला सुरक्षेसाठी कार्यरत दामिनी पथकाला सहा ई-बाईक्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात या दोन्ही उपक्रमांचे लोकार्पण झाले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत, तर दामिनी पथकासाठी ई-बाईक्स विविध संस्थांकडून भेटस्वरूपात देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात २० ठिकाणी हिरकणी कक्ष
महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के राखीव निधीतून हिरकणी कक्षांसाठी २ कोटी १२ लाख १८ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात एकूण २० ठिकाणी हे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले.
यापैकी पोलीस विभागाच्या अखत्यारीतील ११ ठिकाणी, तर परिवहन विभागाच्या माध्यमातून नऊ ठिकाणी हिरकणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. पोलीस विभागांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, सांगली शहर पोलीस ठाणे, मिरज शहर पोलीस ठाणे, जत, तासगाव, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, ईश्वरपूर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे हे कक्ष उभारण्यात आले आहेत. परिवहन विभागाच्या माध्यमातून जत, ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेपूर, कडेगाव, खानापूर आणि पलूस येथे हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
स्तनदा मातांसह किशोरवयीन मुलींना सुविधा
हिरकणी कक्षांचा उपयोग विशेषतः शासकीय कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या गरोदर महिला आणि स्तनदा मातांना होणार आहे. बाळाला स्तनपान करण्यासाठी सुरक्षित आणि स्वतंत्र जागा उपलब्ध होण्याबरोबरच महिलांना काही काळ विश्रांती घेण्याची सुविधाही येथे मिळणार आहे.
किशोरवयीन मुलींनाही मासिक पाळीच्या काळात आवश्यक सुविधा सुरक्षित वातावरणात मिळाव्यात, हा या कक्षांच्या उभारणीमागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी अधिक संवेदनशील वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
दामिनी पथकाला सहा ई-बाईक्स
महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाच्या हालचाली अधिक वेगवान करण्यासाठी सहा ई-बाईक्स उपलब्ध झाल्या आहेत. बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात तातडीने पोहोचण्यास या वाहनांचा उपयोग होणार आहे.
या ई-बाईक्ससाठी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, मिरजचे डॉ. विनोद परमशेटटी, उषःकाल हॉस्पिटलचे सचिव डॉ. मिलिंद पारेख आणि महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सहकार्य केले.
याशिवाय, सिद्धी शो रूमचे श्रीकांत तारळेकर यांनी प्रत्येक ई-बाईकमागे १५ हजार रुपयांची सवलत दिली असून सहा हेल्मेटही भेट दिले. या योगदानाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संबंधित प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित
पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील आणि पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस तसेच महिला व बाल विकास विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक सार्वजनिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सुविधा उभारण्यासोबतच, आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचा प्रतिसाद जलद करण्यावरही या उपक्रमातून भर देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील २० हिरकणी कक्ष आणि दामिनी पथकाच्या नव्या ई-बाईक्समुळे महिला-केंद्रित सुरक्षा व सुविधा व्यवस्थेला प्रत्यक्ष पातळीवर अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
