एएनएम-जीएनएम प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल; शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून सीईटीद्वारे प्रवेश
मुंबई, दि. १५ : राज्यातील एएनएम (सहाय्यक परिचारिका व प्रसूती सेविका) आणि जीएनएम (सामान्य परिचारिका व प्रसूती सेविका) पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि एकसमानता आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील तसेच महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) द्वारे करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय दि. ३० जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यात आतापर्यंत एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जात असल्यामुळे एकसमान निकषांचा अभाव, पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह तसेच विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच या अभ्यासक्रमांसाठीही सीईटी आधारित केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होणार असून प्रवेश प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण होणार आहे.
नव्या प्रणालीअंतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविणार आहे. यामध्ये माहिती पुस्तिका प्रसिद्ध करणे, ऑनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रवेशासाठी जागा निश्चित करणे तसेच केंद्रीकृत पद्धतीने जागावाटप करणे या सर्व प्रक्रिया सीईटी सेलमार्फत पार पाडल्या जाणार आहेत. यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत, पारदर्शक आणि वेळेवर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
प्रवेशासाठीचे पात्रता निकष भारतीय परिचारिका परिषद (इंडियन नर्सिंग कौन्सिल) यांनी निर्धारित केलेल्या नियमांनुसार कायम राहणार आहेत. तसेच राज्य शासनाच्या विद्यमान आरक्षण धोरणानुसारच विविध प्रवर्गांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. सरकारी महाविद्यालयांमधील शुल्क शासनाच्या धोरणानुसार निश्चित करण्यात येईल, तर खासगी महाविद्यालयांतील शुल्क हे शुल्क नियामक प्राधिकरणाच्या नियमांनुसार आकारले जाणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील परिचारिका शिक्षण व्यवस्थेत अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होणार असून आरोग्य क्षेत्रासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि गुणवंत परिचारिका मनुष्यबळ तयार करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एएनएम आणि जीएनएम पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्वनियोजित पद्धतीनेच पार पडणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील तसेच महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सीएपी) राबवून बारावीच्या गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत.
सीईटी आधारित प्रवेश प्रणाली लागू करण्याचा हा निर्णय राज्यातील परिचारिका शिक्षण अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातूनही मत व्यक्त केले जात आहे.

