“ज्ञानाचे स्टार्टअपमध्ये रूपांतर करून विकसित भारत घडविणे ही काळाची गरज” – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
मुंबई, दि. १० : ज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करून देशाच्या आर्थिक प्रगतीला गती देणे ही काळाची गरज असून विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था न राहता नवोपक्रम, बौद्धिक संपदा, स्टार्टअप्स आणि समाजपरिवर्तन घडविणारी सक्षम केंद्रे म्हणून विकसित व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. देशाला विकसित भारताच्या ध्येयाकडे नेण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाधारित संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आय स्पार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्टार्टअप फ्रंटियर १.०’ या दिवसभराच्या परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एचपी इंडियाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता, कौशल्य विकास आयुक्त डॉ. अमित सैनी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपाल सचिवालयाचे सहसचिव एस. राममूर्ती, महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, कुलसचिव डॉ. वैभव नारवडे तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर, गुंतवणूकदार, मार्गदर्शक, उद्योजक, स्टार्टअप्स, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते मेडिकल लॅब आणि एचपी क्रिएटिव्ह गॅरेज लॅब यांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखविला.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, “भारतात कल्पकता आणि नवोपक्रमांची कमतरता नाही, मात्र या नवकल्पनांचे समाजोपयोगी उपाययोजना आणि यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. या दृष्टीने ‘स्टार्टअप फ्रंटियर १.०’ सारखे व्यासपीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. सिंगापूर, इस्रायल आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांकडे विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती नसतानाही त्यांनी मानवी भांडवल, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांच्या बळावर जागतिक प्रगती साधली आहे. भविष्यात विद्यापीठांची ओळख त्यांनी निर्माण केलेल्या नवोपक्रमांवर, बौद्धिक संपदेवर, प्रोत्साहन दिलेल्या स्टार्टअप्सवर आणि समाजावर झालेल्या सकारात्मक परिणामावर ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “विकसित भारताचा अर्थ केवळ आर्थिक समृद्धी नसून सर्वांच्या सर्वांगीण विकासाशी तो जोडलेला आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’ या भारतीय तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत सर्वसमावेशक, न्याय्य आणि समान संधी देणारा समाज घडविण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा मंत्र घोषवाक्य केवळ नसून देशाच्या विकासाचे व्यापक ध्येय असल्याचे सांगून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कौशल्य विकास, उद्योजकता आणि नवोपक्रमांचे लाभ पोहोचले पाहिजेत.”
कार्यक्रमात वाचून दाखविण्यात आलेल्या संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय प्रगती केली असून, उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारक्षमतेत वाढ, उद्योजकता प्रोत्साहन आणि नवोपक्रमाधारित उपक्रमांच्या माध्यमातून ६१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम घडविला आहे. एमएसएसयू आयआर्क फाउंडेशन, इन्क्युबेटर यांसारख्या उपक्रमांमुळे नवउद्योजक आणि युवा नवोपक्रमकर्त्यांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आयआयटी मद्रास प्रवर्तक यांच्याशी झालेल्या भागीदारीतून विद्यार्थ्यांना डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेशन्स विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच एचपी गेमिंग गॅरेज आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेच्या उद्घाटनामुळे विद्यार्थ्यांना उदयोन्मुख उद्योगांच्या गरजांनुसार अत्याधुनिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होईल. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना नवोपक्रम, स्टार्टअप्स आणि उद्योजकता हे आर्थिक विकासाला गती देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.”
कार्यक्रमादरम्यान स्टार्टअप परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधक, गुंतवणूकदार आणि युवा उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणण्यावर भर देण्यात आला. परिषद आणि प्रदर्शनामध्ये विविध नवोपक्रम, तंत्रज्ञानाधारित प्रकल्प, उद्योगाभिमुख संकल्पना तसेच स्टार्टअप्सची उत्पादने आणि संशोधनाधारित उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरणांतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘स्टार्टअप फ्रंटियर १.०’ हा उपक्रम महाराष्ट्रातील नवउद्योजक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी उद्योगविश्वाशी संवाद साधण्याची तसेच गुंतवणूक, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
