१ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
मुंबई, दि. २९ : राज्यातील वाहनांची सुरक्षा अधिक सक्षम करणे, वाहनांची ओळख सुलभ करणे आणि बनावट क्रमांक प्लेटचा वापर रोखणे या उद्देशाने परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे. यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, एचएसआरपी न बसविलेल्या वाहनधारकांना आरटीओमधील अनेक महत्त्वाच्या सेवांचा लाभ मिळणार नाही. यामध्ये वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वाहनावर कर्जबोजा चढविणे अथवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील तांत्रिक बदलांची नोंद, तसेच विविध परवान्यांच्या नूतनीकरणासारख्या सेवांचा समावेश आहे. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ३० जूनपूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट नोंदविलेल्या वाहनधारकांना प्रत्यक्ष बसविण्याची तारीख पुढे मिळाली तरी १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.
राज्यात एचएसआरपी बसविण्याचे काम अधिक कार्यक्षमतेने राबविण्यासाठी राज्याचे तीन विभागीय झोन करण्यात आले आहेत. झोन क्रमांक १ साठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, झोन क्रमांक २ साठी रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि झोन क्रमांक ३ साठी एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाने एचएसआरपी बसविण्याचे अधिकृत दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने तसेच मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून, फिटमेंट शुल्कासह) शुल्क आकारले जाणार आहे.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अंतर्गत पोलीस विभाग आणि परिवहन विभाग संयुक्त किंवा स्वतंत्रपणे कारवाई करू शकतात. त्यामुळे मुदत संपल्यानंतर रस्त्यांवरील तपासणीदरम्यान एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
परिवहन विभागाचे सहआयुक्त शैलेश कामत यांनी सर्व वाहनधारकांसह शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनाही त्यांच्या ताब्यातील सर्व वाहनांवर ३० जूनपूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. वाहनांची सुरक्षित आणि प्रमाणित ओळख सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.
