फुटीर खासदार संजय दीना पाटील यांची पत्रकारांशी अरेरावीची भाषा
मुंबई, दि. २५ : शिवसेना शिंदे गटा मध्ये नुकतेच सहभागी झालेले खासदार संजय दीना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ठाकरे गटातील नेत्यांविरोधात केलेल्या आक्रमक विधानांनंतर आता पत्रकारांशी बोलताना वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या संतप्त प्रतिक्रियेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून त्यावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
अलीकडच्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय दीना पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले होते.
पत्रकारांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीबाबत आणि राजकीय घडामोडींविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संजय दीना पाटील यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी अत्यंत कठोर आणि अश्लाघ्य भाषेत संवाद साधला.
संजय दीना पाटील म्हणाले, “काय बोलू दे, XXच्या XXडीत गेलं आणि तुम्ही येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार आता. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय? कंप्लेंट करायचीये कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय.”
यानंतरही त्यांनी पत्रकारांना उद्देशून कठोर शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले, “उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उभा राहतो, जेवायला देतोय तुम्हाला, मी बोलणार नाही. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं, लिहायचं ते लिहा. लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. कशाला XXडीत घुसताय? बस झाला ना आता. तुला बोललो दोन मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो. बोललो ना भाई आता अजून किती? कशाला हे करतोय?”
याआधीही संजय दीना पाटील यांनी केलेल्या काही विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ठाकरे गटातील नेत्यांना थेट इशारा देताना त्यांनी, “माझ्या वाटेला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात! आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत,” असे वक्तव्य केले होते. या विधानाची गंभीर दखल घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
पत्रकार परिषदेसदृश वातावरणात माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या मुलगी तसेच ठाकरे गटाशी संबंधित नगरसेविका राजुल पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही संजय दीना पाटील संतप्त झाल्याचे दिसून आले.
यावेळी त्यांनी पत्रकारांना उद्देशून म्हटले, “तुम्ही तुमचे माईक माझ्या तोंडासमोर कशाला धरता? आता तुम्ही तिकडून सगळं ऐकून आलात ना, मग पुन्हा इकडे कशाला येताय आणि हे सगळं कशासाठी करताय?”
आपल्या पूर्वीच्या विधानांवर ठाम राहत त्यांनी पुढे सांगितले, “मी जे काही बोललोय ते अगदी खुलेआम आणि जाहीरपणे बोललोय. माझ्यावर जी काही कारवाई करायची असेल ती पोलीस करतील. मी कोणत्याही प्रकारची कारवाई, चौकशी किंवा परिणामांना तोंड देण्यास पूर्णपणे तयार आहे.”
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एका लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांशी वापरण्यात आलेली भाषा, तसेच राजकीय प्रतिस्पर्ध्यांविषयी करण्यात आलेली विधाने यावरून विविध स्तरांवरून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. संबंधित वक्तव्यांबाबत कायदेशीर पातळीवर कोणती पुढील कारवाई होते आणि त्यावर शिंदे गट तसेच विरोधकांची पुढील भूमिका काय राहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
