शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; ‘माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर पक्षप्रमुखपद सोडायला तयार’
मुंबई, दि. १९ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील अलीकडील घडामोडी, खासदारांच्या पक्षांतराची चर्चा आणि संघटनात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्यास पक्षप्रमुखपद सोडण्याची तयारी दर्शवली.
कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसेच अलीकडेच पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केले. मात्र, त्यांच्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी केलेल्या पक्षप्रमुखपदाबाबतच्या वक्तव्यामुळे उपस्थित शिवसैनिक आणि राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष वेधले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्या नेतृत्वावर होणारे आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला या क्षणी तयार आहे. माझ्या जागी एखाद्या सामान्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवा. मला नेतृत्वाची कोणतीही हाव नाही. मी कोणत्याही क्षणी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला तयार आहे.”
या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित शिवसैनिकांनी जागेवरून उठून घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबा दर्शविला. पक्षप्रमुखपद सोडण्याच्या प्रस्तावाला शिवसैनिकांनी तत्काळ विरोध केला. त्यामुळे ठाकरे गटात आगामी काळात काही संघटनात्मक फेरबदल होणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
“मी पदासाठी कधीच चिकटून राहिलो नाही”
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “मी कसा आहे, तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर बोट दाखवलं तर मी एक क्षण पदावर राहत नाही, हे तुम्ही मी मुख्यमंत्रिपद सोडलं तेव्हा पाहिलं आहे. मला पदाची हाव असती तर मी विधान परिषदेत गेलो असतो. आता शिवसेना पक्षाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मी देखील गेली १२-१३ वर्षे संघटनेचे नेतृत्व करत आहे. आता माझ्या नेतृत्वावर आरोप होत असतील तर मी या पदावरून उतरायला तयार आहे. याचं उत्तर विचार करून द्या. माझ्यावरील आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी पद सोडायला तयार आहे. फक्त अट एकच आहे की, ही सोन्यासारखी शिवसेना दरोडेखोर आणि गद्दारांच्या हातात जाऊन द्यायची नाही.”
ते पुढे म्हणाले, “माझ्यावर कोणी आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मला नेतृत्वाची हाव नाही. त्यामुळे मी पद सोडायला तयार आहे. बाकी मी डगमगलेलो नाही, खचलेलो नाही. अनेक संकटं आणि वादळं आली तरी मी पहाडासारखा उभा राहीन. पण ज्यावेळी मी पद सोडावं असं तुम्हाला वाटेल तेव्हा मी पद सोडल्याशिवाय राहणार नाही.”
खासदारांच्या पक्षांतरावरून टीका
अलीकडेच पक्षातून बाहेर पडलेल्या काही खासदारांचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची आठवण सांगितली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान एका शेतकऱ्याने आपल्या खिशातील पैशांचा बटवा निवडणूक लढविण्यासाठी मदत म्हणून दिला होता.
याच संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, “समोरून पैशांचा महापूर असतानाही अशा शेतकरी आणि सामान्य लोकांच्या जीवावर आपण ती निवडणूक जिंकली. मग आता येथील खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर हे पाप कुठं फेडतील? त्यावेळी धाराशिवचे उमेदवारच बोलले होते की, खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? त्यांना ४०० वर्षे झाली तरी गद्दारीचा शिक्का पुसता आला नाही तर तुम्हाला गद्दारीचा शिक्का पुसायला किती वर्षे जावी लागतील?”
भाजप आणि शिंदे गटावर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शिवसेनेने भाजपसोबत जवळपास तीन दशके युती केली, मात्र पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले.
त्यांनी म्हटले, “आजचा वर्धापनदिनाच्या दिवशी शिवसैनिक खचून गेलेला असेल असे अनेकांना वाटत होते, पण शिवसैनिक उलट पेटून उठला असेल. आम्ही ३० वर्षे भाजपसोबत राहून भाजपमध्ये विलीन झालो नाहीत तर आता काँग्रेसमध्ये काय विलीन होऊ?”
भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांचे प्रमाण वाढल्याचा उल्लेख करत त्यांनी विचारले, “आजघडीला भाजपचे दोन तृतीयांश खासदार हे बाहेरून आलेले आहेत. तुमच्यात विचारांचं वांझोटेपण आहे, मग आमची पोरं किती दिवस पळवणार?”
लोकसभा निवडणूक आणि नऊ खासदारांचा उल्लेख
लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा संदर्भ देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बाहेर फिरत नाहीत, असा आरोप होता. पण मी सभा घेतल्या नसत्या, मी फिरलो नसतो तर खासदार निवडून कसे आले असते? मोदींचा चेहरा नसताना शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीला मी दहा सभा घेतल्या.”
ते पुढे म्हणाले, “२०२४ साली मोदींची लाट असताना मतदारांनी माझ्यावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेऊन नऊ खासदार निवडून दिले. ते खासदार आता फोडले, ही फोडाफोडी करून तुम्हाला काय मिळणार आहे, आणखी किती सत्तापिपासू होणार आहात?”
“लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे”
देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी लोकशाही संस्थांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “आज ज्या पद्धतीने देशाचे राजकारण चालू आहे, त्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. देश अराजकाच्या दिशेने चालला आहे. भाजपची वाटचाल ‘वन पार्टी, नो इलेक्शन’च्या दिशेने सुरू आहे. पण भाजप याच वाटेने जात राहिली तर दीर्घकाळ त्यांची सत्ता राहणार नाही.”
राजकीय चर्चांना उधाण
शिवसेनेच्या साठाव्या वर्धापनदिनाच्या व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. अलीकडील पक्षांतरे, संघटनात्मक आव्हाने आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेले पक्षप्रमुखपदाबाबतचे विधान हे भावनिक आवाहन होते की संघटनात्मक पुनर्बांधणीची नांदी, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
