सक्तीच्या पास प्रणालीसह भीमाशंकर मंदिर दर्शन पुन्हा सुरू; दररोज एक हजार भाविकांना प्रवेश
पुणे, दि. १६ : राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दर्शन भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले असून, वाढत्या गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी व पास प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात प्रतिदिन जास्तीत जास्त एक हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार असून, दर्शनासाठी इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, भाविकांना ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाने आगाऊ नोंदणी करून प्राप्त झालेला पास आणि वैध ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी झालेल्या भाविकांची यादी संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. प्रयागराज महाकुंभ २०२५ दरम्यान आलेल्या अनुभवांचा विचार करून नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी अनेक जण भीमाशंकरला भेट देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नवीन सभामंडप, पायरी मार्ग आणि इतर विकासकामे हाती घेण्यात आली होती. या कामांमुळे देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा कालावधी वाढवून ३१ मे २०२६ पर्यंत मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे बांधकाम सामान्य परिस्थितीत पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. मात्र, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन आणि भाविक यांच्या सहकार्यामुळे तसेच रात्रंदिवस काम सुरू ठेवण्यात आल्याने हे महत्त्वाचे काम केवळ पाच महिन्यांत पूर्ण करण्यात यश आले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून दर्शनबारीची उभारणी, परिसर स्वच्छता, गर्दी नियंत्रण व्यवस्था, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षाविषयक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात असून बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री हटवून परिसर अधिक सुरक्षित आणि मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने भाविक, स्थानिक नागरिक तसेच व्यापारी वर्गाला मंदिर व्यवस्थापन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दर्शन व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी पास प्रणाली लागू करण्यात आली असून भाविकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आगामी काळात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सुविधा, सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
