अन्नपदार्थांसाठी वर्तमानपत्राचा वापर टाळा; अन्न सुरक्षा प्राधिकरणाचे विक्रेते आणि व्यावसायिकांना सक्त निर्देश
मुंबई, दि. ६ : अन्नपदार्थ बांधण्यासाठी, वाढण्यासाठी किंवा अन्नाचा थेट संपर्क येणाऱ्या कोणत्याही कारणासाठी वर्तमानपत्राचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक असून अशा प्रकारच्या वापरावर कायदेशीर बंदी आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने अन्न व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी अथवा वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी आणि वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे अलीकडे निदर्शनास आल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या पश्चिम विभागाने तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने संयुक्तपणे कारवाई केली. या घटनेनंतर अशा प्रकारच्या पद्धतींना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती आणि अंमलबजावणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये विविध प्रकारची रासायनिक द्रव्ये, रंगद्रव्ये, बंधक घटक तसेच शिसे आणि इतर जड धातूंचा समावेश असू शकतो. गरम किंवा तेलकट अन्नपदार्थांचा वर्तमानपत्राशी संपर्क आल्यास ही रसायने अन्नामध्ये मिसळण्याचा धोका निर्माण होतो. दीर्घकाळ अशा अन्नाचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
याशिवाय वर्तमानपत्रे छपाई, वाहतूक, साठवण आणि वितरण प्रक्रियेदरम्यान विविध अस्वच्छ वातावरणाच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्यावर रोगजंतू, धूळ, घाण किंवा इतर प्रदूषक असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अन्नपदार्थांचा थेट संपर्क वर्तमानपत्राशी आल्यास अन्नजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.
अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम, २०१८ नुसार अन्न साठवण्यासाठी, गुंडाळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्र तसेच तत्सम छापील साहित्याचा वापर करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना यापूर्वीही विविध वेळा जारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येत आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, उपाहारगृहे, ढाबे, भोजन पुरवठादार, जलद सेवा देणारी खाद्य आस्थापने, घरपोच अन्नसेवा देणारे व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, फेरीवाले तसेच सर्व लघु आणि मध्यम अन्न व्यवसायिकांना विशेष सूचना दिल्या आहेत. अन्नपदार्थातील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी, पदार्थ झाकण्यासाठी, पॅक करण्यासाठी किंवा वाढण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वर्तमानपत्राचा वापर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांच्या विक्री आणि वितरणासाठी केवळ अन्नसुरक्षित दर्जाच्या मान्यताप्राप्त पॅकेजिंग साहित्याचाच वापर करणे बंधनकारक असल्याचे प्राधिकरणाने पुन्हा अधोरेखित केले आहे. अन्न व्यवसायिकांनी पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्यायांचा अवलंब करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण तसेच राज्यस्तरीय अन्न सुरक्षा यंत्रणा अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्तपणे कार्यरत आहेत. सुरक्षित अन्नपदार्थ, शाश्वत पॅकेजिंग आणि ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविले जात असून अन्न सुरक्षा संस्कृती अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, ग्राहकांनीही अन्नपदार्थ खरेदी करताना ते कोणत्या प्रकारच्या साहित्यामध्ये पॅक केले जात आहेत याकडे लक्ष द्यावे. अन्नपदार्थांसाठी वर्तमानपत्र किंवा इतर असुरक्षित साहित्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित अन्न सुरक्षा विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य संरक्षण आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा प्रसार या तिन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सुरक्षित पॅकेजिंगचा वापर अत्यावश्यक असल्याचे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
