महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; घाबरून अतिरिक्त खरेदी न करण्याचे तेल कंपन्यांचे आवाहन
मुंबई, दि. १९ : राज्यभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठेबाजी करू नये, असे आवाहन सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी केले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रातील इंधन पुरवठा सुरळीत आणि अखंडित असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे तेल उद्योग राज्यस्तरीय समन्वयक मिहिर गणेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व तेल साठवणूक केंद्रे, डेपो आणि किरकोळ विक्री केंद्रांमार्फत पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. इंधन साखळीतील वाहतूक, साठवण आणि वितरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून कुठेही तुटवडा निर्माण झालेला नाही.
अलीकडील काही दिवसांत राज्यातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण तेल कंपन्यांनी नोंदवले आहे. मे २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यात डिझेल विक्रीत तब्बल १९.६६ टक्के, तर पेट्रोल विक्रीत २०.३९ टक्के वाढ झाली आहे. तसेच १८ मे २०२६ रोजी एका दिवसातच डिझेल विक्रीत ४९ टक्के आणि पेट्रोल विक्रीत ३४ टक्के वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त पुरवठा व्यवस्था सक्रिय करण्यात आली असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व प्रमुख डेपो आणि इंधन साठवणूक केंद्रांवर सातत्याने देखरेख ठेवली जात असून आवश्यकतेनुसार साठ्याची तातडीने पुनर्भरणी केली जात आहे. पुरवठा साखळीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तेल कंपन्या, वाहतूक यंत्रणा आणि किरकोळ विक्रेते यांच्यात सतत समन्वय ठेवण्यात येत आहे.
घरगुती ग्राहकांसाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठाही नियमित सुरू असल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गॅस वितरण सुरळीत सुरू असून ग्राहकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
इंधनाच्या उपलब्धतेसंदर्भात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा आणि अप्रमाणित संदेश प्रसारित होत असल्याने नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी नेहमीप्रमाणेच इंधन खरेदी करावी आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे तेल कंपन्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य स्तरावर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पूर्वतयारी म्हणून सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तेल कंपन्यांकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत निवेदनांद्वारेच इंधन साठा आणि पुरवठ्याबाबतची अचूक माहिती नागरिकांनी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
