पुणे महानगरपालिकेच्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे, दि. १७ : पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक कर्करोग केंद्राच्या लोकार्पण समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, उपमहापौर परशुराम वाडेकर, महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, वैद्यकीय अधिकारी, आपुलकी फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात आणि देशात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र अनेक रुग्णांना उपचार उशिरा मिळाल्यामुळे आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारतसारख्या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात कर्करोग उपचार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी “कर्करोग ग्रीड” उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांतील रुग्णालये, निदान केंद्रे आणि उपचार यंत्रणा परस्पर समन्वयाने कार्य करतील. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांनाही वेळेत उपचार मिळण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होणार आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी फाउंडेशनने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून उभारलेला हा उपक्रम इतर शहरांसाठीही आदर्श ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयाची पाहणी करून विविध उपचार विभाग, कर्करोग निदान सुविधा, अतिदक्षता विभाग, आधुनिक रेडिओथेरपी आणि केमोथेरपी विभागांची माहिती घेतली. रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुसज्ज आणि रुग्णाभिमुख सुविधांचेही त्यांनी कौतुक केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही या उपक्रमाचे स्वागत करताना आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी पुण्यात उभारण्यात आलेले हे केंद्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठीही उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास महानगरपालिकेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वैद्यकीय तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
