विधान भवनात होणार विशेष समारंभ
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांसह पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एका सदस्याचा शपथविधी समारंभ गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे सर्व नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार आहेत.
या शपथविधी समारंभात विधानपरिषदेवर निवडून आलेल्या दहा सदस्यांचा औपचारिक प्रवेश होणार असून, राज्याच्या राजकीय व विधिमंडळीन क्षेत्रातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झीशान झिआउद्दीन सिध्दीकी, माधवी संजय नाईक, सुनिल विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे, संजय नथ्थुजी भेंडे यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या विद्यमान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सलग पाचव्यांदा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या दीर्घ संसदीय अनुभवामुळे या शपथविधीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
समारंभास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष. अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय विधानपरिषदेतील विद्यमान सदस्य आणि विविध मान्यवरही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर होणारा हा शपथविधी समारंभ महत्त्वाचा मानला जात असून, विधानपरिषदेच्या आगामी कामकाजात नव्या सदस्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
