सेवांची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याचे दिले निर्देश
नवी मुंबई, दि. ६ : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम, परिणामकारक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक घेतली. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांपासून सार्वजनिक रुग्णालयांपर्यंत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सर्व आरोग्य सेवांचे मुख्यालय स्तरावर नियमित मूल्यमापन करून त्यामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, माता-बाल रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, विविध आरोग्य कार्यक्रमांचे अधिकारी तसेच नमुंमपा पीजी मेडिकल संस्थेचे अधिष्ठाता डॉ. ज्ञानेश बेलेकर उपस्थित होते.
महानगरपालिकेमार्फत शहरातील २६ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांद्वारे नागरिकांना वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा दिल्या जात आहेत. या केंद्रांमधून संकलित होणारी नागरिकांच्या आरोग्य स्थितीची माहिती अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह असावी यावर विशेष भर देत आयुक्तांनी त्या माहितीची मुख्यालय स्तरावर पडताळणी करण्याचे निर्देश दिले. माता-बाल रुग्णालये आणि सार्वजनिक रुग्णालयांतील रुग्णसंख्या, उपचारपद्धती आणि सेवा यांचाही नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लसीकरण मोहिमा, आरोग्य तपासणी शिबिरे, विशेष आरोग्य अभियान आणि विविध प्रतिबंधात्मक कार्यक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक प्रभावी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. यासाठी स्थानिक नगरसेवकांचा सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांचा प्रतिसाद वाढविण्याचेही त्यांनी सुचवले.
बैठकीदरम्यान नवी मुंबईतील मागील तीन वर्षांतील जन्मदर आणि मृत्यूदराचा वर्षनिहाय आढावा घेण्यात आला. प्रत्येक मृत्यूमागील कारणांचा अभ्यास करून “डेथ ऑडिट” करण्याचे निर्देश देताना डॉ. शिंदे यांनी मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांचा उपयोग उपचार पद्धती सुधारण्यासाठी करावा, असे सांगितले. आरोग्य सेवा ही संशोधन आणि चिकित्सेवर आधारित असल्याने आकडेवारीचे वैज्ञानिक विश्लेषण करून सेवांची गुणवत्ता वाढवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेमार्फत शहरात विविध प्रकारच्या कर्करोग तपासण्या नियमित केल्या जात असून सकारात्मक रुग्णांवर टाटा ॲक्ट्रेकच्या माध्यमातून पुढील उपचार केले जात आहेत. या तपासण्यांची सद्यस्थिती जाणून घेत आयुक्तांनी सर्व प्रकारच्या कर्करोग तपासण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणांतर्गत माता-बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, प्रजनन दर आणि मृत्यूदराशी संबंधित माहिती संकलित केली जाते. ही माहिती शहराच्या आरोग्य स्थितीचे महत्त्वपूर्ण निर्देशक असल्याचे सांगत डॉ. शिंदे यांनी या आकडेवारीचे विविध स्तरांवर विश्लेषण करून त्यानुसार आरोग्य धोरणे आणि सेवा सुधारणा राबविण्याचे निर्देश दिले.
शहरातील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा स्वतंत्र “टास्क फोर्स” तयार करून नियमित बैठका आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली. राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य आकडेवारीशी तुलना करून नवी मुंबईतील आरोग्य सेवांचे मूल्यमापन करण्यात यावे आणि त्यानुसार भविष्यातील आरोग्य नियोजन अधिक प्रभावी बनवावे, असे त्यांनी नमूद केले.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देताना आयुक्तांनी सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयांमध्येही महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि इतर कल्याणकारी योजनांअंतर्गत सुपर स्पेशालिटी उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि आकडेवारीआधारित आरोग्य व्यवस्थापनावर भर दिला जात असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
