मेट्रो मार्गिका-५अला मंजुरी; विदर्भातील द्रुतगती महामार्ग व कुंभमेळा प्रकल्पांनाही गती
मुंबई, दि. २२ : राज्यातील पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मुंबई मेट्रो मार्गिका-५अच्या टप्पा एक व टप्पा दोनच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विदर्भातील तीन द्रुतगती महामार्ग प्रकल्पांसाठी भूसंपादनाकरिता कर्ज उभारणीला मान्यता देण्यात आली असून नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासही हिरवा कंदील देण्यात आला आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मेट्रो मार्गिका-५अमुळे लाखो प्रवाशांना दिलासा
मुंबई मेट्रो मार्गिका-५अच्या टप्पा एक व टप्पा दोन या एकत्रित प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे १८,१३०.५५ कोटी रुपये असून एकूण लांबी ३४.२१ कि.मी. आहे. या मार्गिकेत १९ स्थानकांचा समावेश आहे. कापूरबावडी ते धामणकर नाका (टप्पा एक) आणि धामणकर नाका ते दुर्गाडी (टप्पा दोन) असा हा प्रकल्प पुढे दुर्गाडी–कल्याण–उल्हासनगरपर्यंत विस्तारित होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील सुमारे ६९ लाख नागरिकांना थेट फायदा होणार असून प्रवास वेळेत सुमारे ४० ते ५० टक्क्यांची बचत अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय आणि केंद्र शासनाच्या मंजुरी प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विदर्भातील द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना गती
विदर्भातील नागपूर–गोंदिया, भंडारा–गडचिरोली आणि नागपूर–चंद्रपूर या तीन द्रुतगती महामार्ग प्रकल्पांसाठी भूसंपादनाकरिता निधी उभारणीला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक कर्ज उभारणी ‘हुडको’मार्फत करण्याबाबत वित्त विभागाशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर–गोंदिया द्रुतगती महामार्गाची लांबी १६२.५७७ कि.मी. असून प्रकल्पाची अंदाजित किंमत १९,५८२.१९ कोटी रुपये आहे. भंडारा–गडचिरोली महामार्ग ९४.२४१ कि.मी. लांबीचा असून त्यासाठी ९३१.१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर नागपूर–चंद्रपूर द्रुतगती महामार्ग २०४.७९९ कि.मी. लांबीचा असून भूसंपादनासाठी २,३५३.९४ कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. हे सर्व प्रकल्प पुढील सहा वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी १०६३ कोटींच्या कामांना मंजुरी
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १०६३ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात वाहनतळ, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन आणि मुख्य नियंत्रण कक्ष उभारणी यांचा समावेश आहे. भाविकांना सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयांमुळे राज्यातील नागरी वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
