आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हितसंरक्षणासाठी अभ्यास गट स्थापन होणार; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा
मुंबई, दि. २१ : राज्यातील आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी विशेष अभ्यास गट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी आयटी क्षेत्रातील कामगारांच्या तक्रारींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
पुणे येथील हिंजवडी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, कामकाजातील अडचणी आणि कामगार हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार शंकर जगताप, अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, तसेच आयटी कर्मचारी संघटना फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज चे अध्यक्ष पवनजीत माने व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत मंत्री फुंडकर यांनी नमूद केले की, आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामे घेण्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अशा घटनांची सखोल चौकशी करून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तसेच, मानव संसाधन नियमांतील त्रुटी दूर करून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय्यता सुनिश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्य निर्वाह निधीशी संबंधित समस्यांबाबतही त्यांनी निर्देश दिले. ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते जुन्या कंपनीशी जोडलेले असून ते ‘डी-लिंक’ झालेले नाही, अशा प्रकरणांची माहिती संबंधित कार्यालयाला देऊन त्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याची कार्यवाही करण्यास सांगितले.
तसेच, शॉप ॲक्ट परवाना असलेल्या प्लेसमेंट एजन्सींची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेकदा अशा एजन्सीमार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेत अनियमितता आढळत असल्याने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून सत्यता पडताळण्यावर भर देण्यात येणार आहे.
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, कामगार विभागाच्या सीआयएस प्रणालीच्या माध्यमातून तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीतून आयटी क्षेत्रातील कामगारांच्या समस्या समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
