अमेरिकास्थित लेखिका पल्लवी शिंदे-माने यांच्या ‘नीलकांचन’ लेख संग्रहाचा शानदार प्रकाशन सोहळा संपन्न
कल्याण, दि. २० : कल्याण येथील बालक मंदिर शाळेच्या सभागृहात काल रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी अमेरिकास्थित लेखिका पल्लवी शिंदे-माने यांच्या ‘नीलकांचन’ या ललित लेख संग्रहाचा प्रकाशन सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. रसिक वाचक आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा स्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय कांडर यांनी पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेचा संपूर्ण प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. प्रमुख पाहुण्या डॉ. निर्मोही फडके यांनी पुस्तकाचा सुंदर आढावा घेत, लेखिकेच्या लेखणीतील सौंदर्य आणि प्रतिभेचे दर्शन घडवले.
यावेळी अभिनेते पांडुरंग भारती आणि चित्रपट दिग्दर्शक विजय शिंदे यांनी लेखिकेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. रुपाली शेंडगे यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत भरली, तर अंकिता काटकर यांनी आभार प्रदर्शन केले. शिंदे-माने परिवार, मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा देखणा सोहळा संपन्न झाला.

