प्रार्थनेस उपस्थिती आणि बेलवृक्षाचे रोपण
वर्धा, दि. १६ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याशी निगडित ऐतिहासिक आश्रमाला भेट देत प्रार्थना सभेत सहभाग नोंदवला तसेच परिसरात बेलवृक्षाचे रोपण केले.
सेवाग्राम येथील आश्रमात आगमन झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सचिव विजय तांबे आणि विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. या भेटीदरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांचे पहिले निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आदि निवास’ तसेच अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या ‘बापूकुटी’ची पाहणी केली.
याशिवाय कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले ‘बा’ निवास आणि बापूंचे तत्कालीन कार्यालय या ठिकाणांनाही त्यांनी भेट दिली. आश्रमाशी संबंधित विविध ऐतिहासिक बाबींची माहिती सचिव विजय तांबे यांनी राष्ट्रपतींना दिली. यावेळी राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सूत कताई करून गांधीवादी परंपरेचा अनुभव घेतला.
भेटीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आश्रम परिसरात बेलवृक्षाचे रोपण केले. तसेच त्यांनी प्रार्थना सभेत सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वान्मथी सी., विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल तसेच आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी, सेवाग्राम हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर राष्ट्रपतींचे राज्यपाल, मंत्री आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले. या भेटीद्वारे राष्ट्रपतींनी गांधीवादी विचारसरणीशी निगडित स्थळांना अभिवादन करत त्यांच्या कार्याची आठवण उजळवली.
