उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अंतिम दिवस
बारामती, दि. ६ : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास राज्यभरातून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
मेळाव्यादरम्यान अनेक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे सभागृहात काही वेळा भावनिक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि भावनिक बांधिलकी दोन्हीही प्रकर्षाने जाणवत होती.
महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. विविध नेत्यांच्या भाषणांनंतर सुनेत्रा पवार यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधत भावनिक भाषण केले.
मेळावा संपल्यानंतर सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि खासदार पार्थ पवार उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांसारखे प्रमुख नेतेही अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहिले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत सुनेत्रा पवार यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला नेत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत होती. विशेषतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर या सतत त्यांच्या सोबत असल्याचे चित्र होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना काही प्रमुख महिला नेत्या अनुपस्थित असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सरोज अहिर आणि आमदार सना मलिक या तीन महिला नेत्या उपस्थित असल्याचे दिसून आले.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध पक्षांकडून प्रचाराची तयारीही जोर धरत आहे. आगामी काळात या मतदारसंघात राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
