नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात अंजली दामनियांचे नवे आरोप; सीडीआरवरून राजकीय वर्तुळात खळबळ
नाशिक/मुंबई, दि. ३ : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवनवे आरोप समोर येत असून महिला लैंगिक शोषणासोबत आर्थिक गैरव्यवहारांचेही धागेदोरे उलगडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) संदर्भात गंभीर आरोप करत या प्रकरणात खळबळ उडवली आहे.
सीडीआर मिळाल्याचा दावा; वरिष्ठांना माहिती
अंजली दमानिया यांनी दावा केला की, १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीतील अशोक खरात यांचा सीडीआर त्यांच्या हाती लागला आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी पोलीस महासंचालक तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
विविध नेत्यांशी संपर्काचे आरोप
दमानिया यांनी केलेल्या आरोपांनुसार, काही राजकीय व्यक्तींशी अशोक खरात यांचे दूरध्वनी संपर्क झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये रुपाली चाकणकर यांचे १७७ कॉल्स, तर प्रतिभा चाकणकर यांचे २३६ कॉल्स झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे १७ कॉल्स (१० इनकमिंग व ७ आऊटगोईंग) झाल्याचा दावा करण्यात आला असून, या संवादाचा कालावधी सुमारे २१ मिनिटे असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे (८ कॉल्स) आणि आशिष शेलार (१ कॉल) यांच्याशीही संपर्क झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सर्वाधिक संभाषणावरील तपशील
अशोक खरात यांच्यासोबत सर्वाधिक वेळ कोणाचा संपर्क होता याबाबतही दमानिया यांनी माहिती दिली. त्यानुसार तृप्ती खरात यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर यांचा समावेश आहे.
रुपाली चाकणकर यांनी सुमारे ३३ हजार ७२७ सेकंद, तर दिपक लोंढे यांनी ३० हजार ५२९ सेकंद संभाषण केल्याचा दावा करण्यात आला आहे. दिपक लोंढे यांचे एकूण १८९ कॉल्स झाल्याचेही सांगण्यात आले. तसेच कतार, युएस आणि व्हर्जिन आयलंड्ससारख्या परदेशी ठिकाणांहूनही अशोक खरात यांना कॉल्स आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पतसंस्थेतील व्यवहारांवर संशय
दरम्यान, कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत आर्थिक व्यवहारांबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५७ खातेदारांनी १०० खाती उघडली असून, या सर्व खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून अशोक खरात यांचे नाव नोंदवले असल्याचा दावा आहे. या खात्यांद्वारे सुमारे ६० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे.
या खात्यांपैकी काही खाती खरात कुटुंबीयांच्या नावावर असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच चाकणकर आडनावाच्या व्यक्तींचाही या खात्यांमध्ये समावेश असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांकडून अधिकृत माहिती प्रलंबित
या प्रकरणात संबंधित खातेदारांची नावे उघड करण्याबाबत विचारणा केली असता पोलिसांकडून तपशील देण्यास नकार देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अशोक खरात प्रकरणात सीडीआर, आर्थिक व्यवहार आणि विविध संपर्क यांबाबत करण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून, यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ निर्माण झाली आहे.
