शिवजयंतीनिमित्त उसळला युवा सागर;‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेला मशालींसह उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत तर्फे सातारा येथे आयोजित ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा आज यशस्वीरित्या पार पडली. या पदयात्रेत १२००० हून अधिक तरुण आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या आदर्शांवर वाटचाल करीत विकसित भारत घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात साताऱ्यातील ऐतिहासिक राजवाडा परिसरातून करण्यात आली. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र राज्यगीताने कार्यक्रमाची भव्य सुरुवात झाली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी स्वतः मशाल हाती घेत पदयात्रेचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो युवक-युवती तिरंगा, माय भारतचा ध्वज आणि भगवा पताका हातात घेऊन पावलोपावली विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प पुनरुच्चारित करत पुढे सरसावले.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी युवकांना संबोधित करताना सांगितले की,“जय शिवाजी, जय भारत”पदयात्रेचा उद्देश युवक पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान जीवनगाथेशी परिचित करून देणे हा आहे, जेणेकरून युवकांमध्ये अदम्य साहस, स्फूर्ती आणि नवऊर्जेचा संचार होऊन ते विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवतील. त्यांनी युवकांना शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाज व राष्ट्रविकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, विचार आणि मूल्यांचा आढावा घेत युवकांना त्यांच्या आदर्शांना आत्मसात करण्याचे आवाहन केले. स्वराज्य स्थापन करून शिवाजी महाराजांनी आत्मसन्मान, न्याय आणि जनहित यांना सर्वोच्च स्थान दिल्याचा संदेश दिला, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, माय भारत राज्य संचालक (महाराष्ट्र) कालिदास घटवाल, माय भारत सल्लागार प्रकाश वैद्य, उपसंचालक अरुण कुमार तिवारी, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजीत बापट, जिल्हा युवा अधिकारी (माय भारत) सातारा स्वप्निल देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पदयात्रा राजवाडा येथून सुरू होऊन गोलबाग, राजपथ, शाहू चौक आदी प्रमुख मार्गांवरून सुमारे २.५ कि.मी. अंतर पार करत पोवई नाका येथे समाप्त झाली. मार्गात विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक मराठी लोकनृत्य, लेझीम, ढोल-ताशा वादन आणि युद्धकौशल्याच्या सादरीकरणातून शिवाजी महाराजांची शौर्यपरंपरा आणि मराठ अस्मिता यांचे प्रभावी दर्शन घडले.
युवक-युवती पारंपरिक मराठी वेशभूषेत पदयात्रेत सहभागी झाले होते. युवतींनी नऊवारी साडी तर युवकांनी पारंपरिक पगडी व धोतर-कुर्ता परिधान करून शिवकालीन परंपरेचे जिवंत चित्र साकारले. “जय शिवाजी, जय भारत”, “माय भारत, विकसित भारत” अशा घोषणांनी संपूर्ण सातारा शहर दुमदुमून गेले.
पदयात्रेदरम्यान युवकांसाठी उभारण्यात आलेले विशेष सेल्फी स्टँड आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. अनेक युवकांनी माय भारतच्या क्यूआर कोडचे स्कॅनिंग करून स्वयंसेवक म्हणून ऑनलाइन नोंदणी केली. माय भारतच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mybharat.gov.in) नोंदणी करून युवकांनी राष्ट्रनिर्मितीच्या उपक्रमांत सक्रिय सहभागाची बांधिलकी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या विविध योजनां व अभियानांवरील माहितीपटांचे प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमातून युवकांना राष्ट्रनिर्मितीतील त्यांची भूमिका, नेतृत्व विकास आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान यांविषयी प्रेरित करण्यात आले. विशेषतः ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ या उपक्रमाच्या गीताने युवकांना देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले. तसेच माय भारत प्लॅटफॉर्मवरील ‘बजेट क्वेस्ट क्विझ २०२६’ची माहिती देण्यात आली.
या आयोजनात माय भारत युवा क्लब, महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांचे युनिट्स, एनसीसी कॅडेट्स, सामाजिक संस्था तसेच विविध युवक गटांतील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पदयात्रेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांतून त्यांनी आपली प्रतिभा आणि राष्ट्रभक्ती सादर केली.
