वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न राबविणा-या ७ बांधकामांवर नवी मुंबई महापालिकेकडून काम बंदची कारवाई
नवी मुंबई, ३१: नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागांतर्गत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वत:हून दाखल करून घेतलेली (Suo Moto) जनहित याचिका क्र. ३/२०२३ मध्ये, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
त्या अनुषंगाने, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंग करीता अवलंबवायची ‘मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure – SOP)’ व बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण दंडात्मक कारवाईबाबतची नियमावली मानक कार्यप्रणाली अन्वये दंडात्मक शुल्क भरणा करणेबाबत संबंधित विकासक/बांधकाम धारकांस कळविण्यात आलेले होते.
तसेच ध्वनी/वायू प्रदूषण नियंत्रणाकरीता आवश्यक उपाययोजना केल्याबाबत खातरजमा करूनच काम करण्यात यावे. तसेच बांधकाम स्थळच्या सभोवताली ५०० मीटर पर्यंतच्या परिसरात व रस्त्यांवर धूळ प्रदूषण होऊ नये याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी अन्यथा सुरु असलेले बांधकाम त्वरित बंद करण्याची कार्यवाही (Stop work) करण्यात येईल अशा आशयाच्या नोटीसा संबंधित विकासक/बांधकाम धारक यांना बजाविण्यात आलेल्या आहेत.
तथापि, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सुरु असलेल्या बांधकाम/विकास कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता सदर पाहणीमध्ये पुढीलप्रमाणे त्रूटी आढळून आलेल्या होत्या.
१. बांधकाम प्रकल्पाच्या परिघाभोवती किमान ३० फूट उंच टिन धातूचे पत्रे लावणे आवश्यक असताना प्रकल्पावर त्यापेक्षा कमी उंचीचे टिन धातूचे पत्रे आढळून आले.
२. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना सर्व बाजूने हिरव्या कापडाच्या ओल्या ज्यूट शीटच्या ताडपत्रीने बंद केलेले आढळून आलेले नाही.
३. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडींग आणि अनलोडींग करताना वॉटर फॉगींग केले जात नाही.
४. बांधकाम मजुरांनी मास्क, गॉगल्स, अॅप्रॉन इ. परिधान केलेले आढळून आले नाही.
५. बांधकाम स्थळाच्या सभोवतालच्या ५०० मीटर पर्यंतच्या परिसरात व रस्त्यांवर धूळ प्रदूषण होऊ नये याकरिता पाणी फवारणी यंत्र कार्यान्वित असल्याचे आढळून आले नाही.
६. घनमाती/बांधकाम साहित्य इत्यादी वाहतूक करताना हिरव्या कपड्याने झाकलेले आढळून आले नाही.
७. या पाहणी दरम्यान बांधकाम स्थळाच्या ठिकाणी कोणीही जबाबदार प्रतिनिधी/व्यवस्थापक उपस्थित नव्हते.
हवा प्रदूषणात होणा-या वाढी संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांची स्वतःहून दाखल करून घेतलेली जनहितार्थ याचिका क्र. ३/२०२३ च्या आदेशान्वये धूळ व प्रदूषण रोखण्याकरिता विकासक/बांधकाम धारक यांचेमार्फत तातडीने उपाययोजना करणेबाबत आवश्यक आहे. परंतु या बाबत योग्य उपाययोजना केल्या नसल्याचे निदर्शनास आले.
त्याअनुसार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी खालील बांधकामे/विकास कामांच्या साईट्स सीलबंद करण्यात आलेल्या आहेत.
१. मे. साई अमृत बिल्डर्स, भुखंड क्र. १६ व १७, सेक्टर २०, सानपाडा, नवी मुंबई.
२. मे. मेट्रीक्स बिल्डर्स, भुखंड क्र. १०, सेक्टर १९, सानपाडा, नवी मुंबई.
३. मे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपर्स, भुखंड क्र. १२, सेक्टर २०, सानपाडा, नवी मुंबई.
४. मे. कामधेनु ग्रीन, भुखंड क्र. ६ व ७, सेक्टर १९, सानपाडा, नवी मुंबई.
५. मे. रॉयल पाम डेव्हलपर्स DPVG Ventures LLP, भुखंड क्र. ९B, सेक्टर २०, सानपाडा, नवी मुंबई.
तसेच दि. २९ जानेवारी २०२६ रोजी खालील बांधकामे/विकास कामांच्या साईट्स सीलबंद करण्यात आलेल्या आहेत.
१. मे. कामधेनु लाईफ स्पेस, भुखंड क्र. १८ व २५, सेक्टर- ८, सानपाडा, नवी मुंबई.
२. मे. सत्यम लाईफ स्पेस, भुखंड क्र. ०७, सेक्टर १६ए, सानपाडा, नवी मुंबई.
सदर मोहिम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशान्वये, अति. आयुक्त डॉ. राहुल गेठे व अतिक्रमण उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली, तुर्भे विभागातील स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये राबविण्यात आली. या मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू प्रदूषण रोखण्याकरिता सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
