सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांचा पालिका निवडणुकीदरम्यान खळबळजनक आरोप
पनवेल/नवी मुंबई, दि. ९: पनवेल महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चर्चा सध्या निवडणुकांच्या रणधुमाळीतही चालूच आहे. काही दिवसांपूर्वी पनवेल येथील कंत्राटदारामार्फत कथितरित्या काळ्या पैशांचा वापर करत खरेदी करण्यात आलेल्या एका मालमत्तेशी संबंधित वादाचे वृत्त महाराष्ट्र वार्ता ने प्रसारित केले होते.
नवीन पनवेल येथील मालमत्ता सल्लागार निलेश खेतले व त्यांच्या सहकाऱ्यांनी, पनवेल Panvel महापालिकेचे कंत्राटदार अक्षय तांबोळी Akshay Tamboli यांना खरेदीकरिता एक दुकान दाखवलं होतं. ज्याचा खरेदी व्यवहार तांबोळी यांनी निलेश यांच्या अपरोक्ष कोणताही मेहनताना न देता पूर्ण केला. आपली फसगत झाल्याचे कळताच निलेश यांनी केलेल्या कामाचा मेहनताना मिळवण्यासाठी तांबोळी यांना कायदेशीर नोटीस बजावली. सोबतच त्यांनी महाराष्ट्र वार्ताकडे आपलं म्हणणं मांडताना, या दुकानाचा व्यवहार हा १ कोटींहून अधिक रुपयांना झाल्याचे सांगितले होते. या साऱ्याची खातरजमा करताना महाराष्ट्र वार्ताच्या शोधपत्रिका विभागाच्या असे निदर्शनास आले की, सदरचा व्यवहार कागदोपत्री ५५ लाख रुपयांना झाल्याचे दाखवण्यात आलेला आहे. या व्यवहारात मूळ मालकाने उर्वरित रक्कम ही रोकड स्वरूपात स्वीकारली होती.
यावेळी, रोकड स्वरूपात असलेली रक्कम नेमकी कोणाची होती असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक होतं. हे पैसे पनवेल महानगरपालिकेतील कंत्राटांमधील भ्रष्टाचारातून निर्माण झाले असून ही मालमत्ता विकत घेण्यासाठी पालिकेतील एका कंत्राटदारासोबतच बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळील काळ्या पैशांचा वापर करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. सध्या पनवेल महानगरपालिका आयुक्त कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी चालू आहे.
या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ पत्रकार अतुल शिलवंत यांनी उडी घेतली आहे. पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर Sanjay Katekar व कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे Sudhir Salunkhe यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. फेसबुक व एक्स या समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की हे दोघे अधिकारी एक नंबर चे भ्रष्टाचारी आहेत. वाचा नेमके काय म्हणणं आहेत अतुल शिलवंत याचं:
“पनवेलकरांनो, पनवेल महानगरपालिकेतील कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने, भ्रष्ट मार्गाने कमावलेला काळा पैसा कसा सफेद केला जातोय ते पहा. नवीन पनवेल इथल्या अक्षय तांबोळी या पनवेल महापालिकेच्या कंत्राटदाराने निलेश खेतले यांच्या मार्फत परंतु, त्यांचा मेहनताना बुडवत, एक दुकान खरेदी केलं आहे. या दुकानाचा खरेदी व्यवहार हा १ कोटींपेक्षा जास्त रुपयांना झाला आहे. अक्षय तांबोळी यांनी या मालमत्तेचा व्यवहार पूर्ण करताना ५५ लाख रुपये अधिकृतरीत्या व्हाईट मध्ये दिल्यानंतर उर्वरित रोख रक्कम पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर व कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे यांच्या जवळील काळ्या पैशांतून दिली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ज्यात तथ्य आहे असं मला वाटतं. कारण पनवेल महानगरपालिकेमार्फत बांधकाम विभागातील कामांसाठी विशिष्ट कंत्राटदारांनाच झुकतं माप दिलं जात असून यातून भ्रष्ट मार्गाने पालिकेतील शहर अभियंता संजय कटेकर व कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे यांनी अमाप काळं धन गोळा केलं आहे. पालिकेच्या या कंत्राटदाराने दुकान विकत घेण्यासाठी हेच काळं धन वापरलेलं आहे हे स्पष्ट होतंय. हे दोघे अधिकारी एक नंबर चे भ्रष्टाचारी आहेत. ज्या ठिकाणी तांबोळी यांनी गाळा विकत घेतलाय त्या संपूर्ण परिसरात त्याच आकाराच्या दुकान किंवा कमर्शियल प्रॉपर्टीचा दर आजमितीला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बाजारभावापेक्षा अर्ध्या रकमेत व्यवहार होतो आणि कोणालाच त्याचं अप्रूप वाटत नाही याला काय म्हणावं. त्यामुळे आयुक्तांनी अंतर्गत चौकशीचा फार्स करण्यापेक्षा थेट महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रकरण सोपवावं. चौकशी पूर्ण होईपर्यंत शहर अभियंता संजय कटेकर व कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे या दोघांना निलंबित करावं. हे पैसे सामान्य पनवेलकरांनी मालमत्ता कराच्या स्वरुपात पालिकेकडे जमा केलेल्या रकमेतील आहेत याची जरा तरी जाण ठेवावी !”
पनवेल महानगरपालिकेतील निविदा प्रक्रियेत चालणारे घोटाळे हि काही आता लपून राहिलेली बाब नाहीये. प्रश्न असा उपस्थित होतो कि, पालिका प्रशासन भ्रष्टाचाराच्या दलदलीत बरबटलेल्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास का टाळाटाळ करतंय. एकतर वर्षानुवर्ष हे अधिकारी एकाच पदावर गोचीडीसारखे चिकटून राहतात व अमाप काळा पैसा Black Money बनवतात. नंतर, हेच पैसे विविध व्यवसायांमध्ये आपल्या नातेवाईक-मित्रमंडळीं मार्फत गुंतवतात किंवा या पैशांच्या माध्यमातून रियल इस्टेट क्षेत्रात बेनामी गुंतवणूक करतात. या प्रकरणातही अशाच प्रकारे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील काळा पैसा पालिकेतील कंत्राटदारामार्फत स्थावर मालमत्तेत ‘पार्क’ केलेला दिसतोय. सध्या राज्यातील इतर महापालिकांसोबतच पनवेल महानगरपालिकेसाठीही येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून जोरात प्रचार चालू आहे. पण, या दरम्यान पालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा थेट उल्लेख कोणताच विरोधी पक्ष करताना दिसत नाही. पनवेल महानगरपालिकेत घोटाळे नेमके कशा प्रकारे केले जात आहेत, त्यात कोण कोण सामील आहे याबाबत एखादा पक्ष सोडला तर, बाकीच्यांनी मौन धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, असे भ्रष्ट अधिकारी आणखी मुजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे Mangesh Chitale हे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काही ठोस कारवाई करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत, खरंच या अधिकाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा इतर तपास यंत्रणांकडे तक्रार करतात का हे पहावे लागेल.
