वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई, दि. ७: मराठी संगीत क्षेत्रातील हरहुन्नरी संगीतकार सतीशचंद्र मोरे याचं बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. जागतिक कीर्तीचे मराठी कवी व लेखक दिवंगत नामदेव ढसाळ यांनी लिहिलेल्या अनेक कवितांना त्यांनी संगीतबद्ध केलं होतं. त्यांच्या ‘बहर प्राजक्ताचा’ व ‘प्रेम एक तरल भावना’ या अल्बम्स मधील गाण्यांनी मोरे यांना खरी ओळख मिळवून दिली. यातील गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी गायलेले ‘या तृष्णेने’ व गायक शान याने गायलेले ‘पहाटेच्या गारठ्यात तू मिठीत यावे’ हि गाणी विशेष नावाजली गेली. सतीशचंद्र मोरे याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचनांना कलोनियल कझन फेम लेल्सी लुईज यांच्यासह कैलास खेर, शौनक अभिषेकी, सुरेश वाडकर, साधना सरगम, वैशाली सामंत आदि दिग्गज गायकांनी स्वरबद्ध केले होते.
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या असित रेडीज दिग्दर्शित ‘या गोल गोल डब्यातल्या’ चित्रपटाला सतीशचंद्र मोरे यांनी संगीत दिलं होतं. यात त्यांनी चक्क मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्याकडून एक गाणं गाऊन घेतलं होतं, जे याच चित्रपटाचं शीर्षकगीतही होतं. नुकतीच मोरे यांनी ‘लागू बंधू’ या आभूषणांच्या ब्रँडसाठी एक गाणं संगीतबद्ध केलं होतं. संगीतकार सतीशचंद्र मोरे यांच्यासारखा स्वभावाने मनमिळावू, संगीतावर बेमालूम प्रेम करणारा व सदैव जमिनीवर पाय असलेल्या मित्राच्या अकाली निधनामुळे संगीत व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या मित्र परिवाराला धक्का बसला आहे. दलित पॅंथर चे संस्थापक, कविवर्य नामदेवराव ढसाळ यांच्या सोबतची त्यांची मैत्री हि सुपरिचित होती. अखेरच्या श्वासापर्यंत सतीशचंद्र मोरे यांनी नामदेव ढसाळ यांना सोबत दिली.
