अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारं एक व्यक्तिमत्व हरपलं
पनवेल, दि. १३: पनवेल तालुक्यातील नेरे येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर दळवी यांचे काल रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, मुलगा ओमकार दळवी व नातवंडे असा परिवार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वेळवी हे त्यांचे मूळ गाव होते. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी त्यांचे बालपण गेले. जवळपास ३० हून अधिक वर्षे त्यांनी रायगड जिल्हा परिषदेत विविध पदांवर सेवा बजावली. सर्वांशी हसतमुख व वेळेला मदतीला धावून जाणारे असे ते व्यक्तिमत्व होते. नेरे ग्रामपंचायत हद्दीतील वादग्रस्त अशा महालक्ष्मीनगर संकुलातील अनेक समस्यांसंबंधी मागील अनेक वर्षांपासून ते आवाज उठवत आलेले होते. यात विशेषतः विकासकाकडून करण्यात आलेल्या अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात तसेच संकुलातील मुख्य प्रवेशद्वारावरील रस्त्याच्या गंभीर समस्येसंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. ते राहत असलेल्या ऑर्किड गृहनिर्माण संस्थेतील गैरकारभाराविरोधात तर त्यांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
