प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै वरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली
मुंबई, दि. २७: अधिसूचित प्राप्तिकर विवरणपत्रात (आयटीआर) करण्यात आलेल्या व्यापक बदलांमुळे आणि कर निर्धारण वर्ष (एवाय) २०२५-२६ साठी प्रणाली सज्जता आणि आयटीआर युटिलिटीजच्या अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, करदात्यांना सुलभ आणि सोयीस्कर रिटर्न फाइलिंगचा अनुभव देण्यासाठी, आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ ऐवजी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात एक औपचारिक अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.
अनुपालन सुलभ करणे, पारदर्शकता वाढवणे आणि अचूक माहिती सक्षम करण्याच्या उद्देशाने २०२५-२६ साठी अधिसूचित आयटीआरमध्ये संरचनात्मक आणि आशय सुधारणा करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे संबंधित युटिलिटीजच्या प्रणाली विकास, एकत्रीकरण आणि चाचणीसाठी अतिरिक्त वेळ आवश्यक आहे. शिवाय, ३१ मे २०२५ पर्यंत दाखल करावयाच्या टीडीएस विवरणपत्रांमधून निर्माण होणारे क्रेडिट जूनच्या सुरुवातीला दिसून येतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे अशा मुदतवाढीशिवाय विवरणपत्र दाखल करण्यासाठी प्रभावी कालावधी मर्यादित होईल. या मुदतवाढीमुळे हितधारकांनी उपस्थित केलेल्या चिंता दूर होतील आणि अनुपालनासाठी पुरेसा वेळ मिळेल, ज्यामुळे विवरणपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेची अखंडता आणि अचूकता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे.
