मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडवली महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याची खिल्ली
ठाणे, दि. १०: आज मुंबईत कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्रानामा’ या नावाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जाहीरनाम्याची आता खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची टीका मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे इथं आज त्यांनी प्रचारासाठी रॅली काढली, तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते. महायुतीने ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केली, तेव्हा पैसे कुठून आणणार असं म्हणत आमच्याविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्यांनी आता आमच्या योजना चोरून आता ते खोटी आश्वासनं देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रानाम्यात महिलांना ३१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. हाच मुद्दा हेरत आता महायुतीकडून महाविकास आघाडीवर तोफ डागण्यात येत आहे.
