या खासदारांनी घेतली संस्कृत मधून शपथ पण…
नवी दिल्ली: काल संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्रातले खासदार मराठीतून शपथ घेणार की इंग्रजी अथवा हिंदीतून घेणार या बाबत समस्त मराठी जनांना फार उत्सुकता होती. यावेळी परंपरेप्रमाणे शिवसेनेच्या सर्वच्या सर्व १८ खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. भाजपच्याही १८ खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे तसेच काँग्रेस चे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनीही मराठीतून शपथ घेतली. विशेष म्हणजे भाजपचे मनोज कोटक, अपक्ष नवनीत कौर राणा व एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनीही मराठीतून शपथ घेतली.
राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले व भाजपचे सुजय विखे पाटील यांनी मात्र फर्ड्या इंग्रजीतुन शपथ घेतली. त्याचवेळी भाजपचे उन्मेश पाटील, सुनील मेंढे आणि गिरीश बापट यांनी देवानी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. भाजपच्या पूनम महाजन, सुधाकर शृंगार, गोपाळ शेट्टी, हीन गावित यांनी मात्र हिंदीतून शपथ घेतली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर #मराठीतूनशपथ ही मोहीम जोरात होती. ज्या पार्श्वभूमीवर अशी अपेक्षा होती की महाराष्ट्रातील सर्व खासदार आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीतूनच शपथ घेतील.
