#जीवन चेतना
भीती: एक यशदायी शक्ती
– “मला भीती विसरायचीये.”
– “का रे?”
– “आयुष्यात पुढे जाण्यासाठी.”
– “वाट अडवलीये कुणी?”
– “भीतीने. म्हणूनच विसरायचीये.”
– “त्याने काय होईल?”
– “भीतीने जागेवर थिजवलंय.”
– “बरं; मग?”
– “निडरपणा गती देईल.”
– “कपाळमोक्षासाठी.”
– “नाही; आयुष्यात जिंकण्यासाठी.”
– “हा प्रश्न नव्हता. एक विधान होतं.”
– “काय?”
– “भीतीला विसरशील; गतीची सद्गती होईल.”
– “च्यायला तू इतका सडू का आहेस?”
– “मी वास्तववादी आहे.”
– “यात काय कपाळ वास्तव आहे?”
– “भीती कुणी ठेवल्ये माणसाच्या मेंदूत?”
– “निसर्गाने.”
– “निसर्गाच्या प्रत्येक यंत्रणेमागे एक हेतू असतो.”
– “भीतीचा काय हेतू? उपयोगशून्य आहे भीती.”
– “जिवंत राहणं उपयोगशून्य आहे?”
– “जिवंत राहणं?”
– “भीती समजावून सांगतो. ऐक. जंगलात राहायचो आपण हजारो वर्षांपुर्वी. जवळच्या झुडपातली खसखस म्हणजे एखादा ससा असू शकायचा. किंवा दबा धरून बसलेला वाघही. ससा म्हणजे आपल्या जेवणाची सोय. आपण म्हणजे वाघाच्या जेवणाची सोय. प्रश्न हा, की यातलं नक्की काय असेल?”
– “बरं; मग?”
– “नेणिवेच्या पातळीच्या प्रेरणांनी जे माहितीपल्याडचं आहे त्याला भिऊन राहायला शिकवलं आपल्याला. Fear the unknown. उपयोगाची होती ती हुशारी.”
– “कसली हुशारी?”
– “भीती विसरून सशाच्या लालसेपोटी झुडपाजवळ जावं; अन् वाघाने नरड्यावर झेप घ्यावी; असं घडलं तर किंमत मोठी चुकवावी लागायची आपल्या पूर्वजांना. हवं तर आजचा दिवस ऊपाशी राहून माघार घेणंच शहाणपणाचं होतं.”
– “हे कसलं शहाणपण? हा तर पलायनवाद झाला. आणि प्रत्येक वेळी वाघच असेल असं समजणं म्हणजे तर निव्वळ फोबिया.”
– “गड्या, गोष्ट संपली नाही अजून! आपले पूर्वज माघार घेऊन विषय संपवायचे नाहीत.”
– “म्हणजे… ते परत यायचे?”
– “अर्थात! झुडपात काय आहे ते माहीत नसणं, आणि त्याची भीती वाटणं, ही उपयोगाची माहिती असायची. ‘क्षमता वाढवायला हव्यात’, याची ती प्रेरणा असायची. हे प्रोत्साहन असायचं, ताकदीच्या वृद्धीसाठी. सक्षमतेसाठी. परिस्थितीशी काबील लढण्यासाठी. ते भाले घेऊन निघायचे. तीर-कमठे घेऊन निघायचे. दोघं दहांना घेऊन निघायचे. भीती टीम वर्क शिकवायची. शिस्त शिकवायची. प्रगती करून घ्यायची.”
– “मग माझ्यासारख्यांना का उपयोगी पडत नाहीये ही भीती?”
– “कारण तुझ्यासारखे वीर ती पूर्वजांप्रमाणे वापरत नाहीयेत. तुमच्यातले काही माघार घेऊन परत आलेत; आणि ‘ससा असला असता तर?’ म्हणून जागेवरच चळत बसलेत; काहींनी ‘झुडपातल्या वाघा’च्या मिथकाला प्रमाण समजून फोबियात बुडून राहणं पसंत केलंय; आणि शेवटी राहीलास तू! तू सर्वात जास्त नालायक. तुला ‘ससाच असेल’ या विशफूल थिंकींगला कवटाळणं हवंय, ज्याला तू पॉझिटिव थिंकींग समजतोयस! या तीन प्रकारात कुणीही क्षमता वाढवणं या बेसिक गोष्टीसाठी झटत नाहीये.”
– “मग मी काय करायला हवं?”
– “तेच, जे आपले पूर्वज करायचे. तुझी भीती ही निसर्गाने गंमत म्हणून मेंदूत फुंकलेली गोष्ट नाही; ती एक उपयोगी शक्ती आहे. तिला वापर. स्वत:चं परीक्षण कर. परिस्थितीचं परीक्षण कर. माहिती मिळव. काय आणि कुठे कमी पडतंय, ते शोधून ओळख. गरजेनुसार कौशल्यं आत्मसात कर. भाले आणि बाणाचं भातं भरून घे. एक-एक बाण सातत्याने मिळवत जा. जे मिळवलंय त्याला मनाकडून आत्मविश्वासाची प्रतिक्रिया येईल. मनोवृत्ती उत्क्रांत होतील. आणि मग झुडपासमोर उभा ठाक. असा मिळवतात विजय.”
श्री. अपूर्व विकास (समुपदेशक)
(निगडी, पुणे)
8928183848
7774917184 (WhatsApp)
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)
