महाविकास आघाडीच्या मालवण बंद ला लाभला १०० टक्के प्रतिसाद
सिंधुदुर्ग, दि. २८: राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजकोट किल्ल्याला भेट दिली. त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पाटील बोलत होते.
पुतळा बनवण्याचं काम अपरिपक्व माणसाला दिलं होतं, याची जबाबदारी सरकारला झटकता येणार नाही, असं पाटील म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. पुतळ्याचे शिल्पकार आणि बांधकाम सल्लागार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावरही पाटील यांनी टीका केली. सरकारने कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल करून काहीतरी कारवाई केली असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली. याप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, मालवण राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज तिथं गेलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस आणि एक महिला असे दोघे जखमी झाले. आज महाविकास आघाडीने मालवण बंदची हाक दिली होती, त्याला मालवण मध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मालवणची पूर्ण बाजारपेठ आज बंद होती. महाविकास आघाडीच्या मोर्चाला सकाळी सुरु झाला. या मोर्च्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे, तसंच आदित्य ठाकरे, जयंत पाटील हे सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, आणि भाजपा नेते निलेश राणे तसंच त्यांचे समर्थक राजकोट इथं एकमेकांसमोर येताच दोन्ही बाजूकडून दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांची पोलिसांसोबत हुज्जतहि झाली.
Source – AIR
