से. ५८ ए नेरुळ परिसरात जांभूळ, वड, पिंपळ, कडुलिंब अशा देशी वृक्षरोपणातून नवी मुंबईतील निसर्गाला हरित साज
नवी मुंबई, दि. ८: नवी मुंबई हे स्वच्छ, सुंदर व राहण्यास समाधान वाटेल असे शहर असून स्वच्छ सर्वेक्षणात आज देशात तिस-या क्रमांकाचे स्वच्छ शहर असले तरी नागरिकांच्या एकत्रित सहभागाने भारतात नंबर वनवर येईल असे मत व्यक्त करीत महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर ५८ ए, नेरुळ परिसरात हाती घेतलेला देशी वृक्ष लागवडीचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे सांगितले व अशा अभिनव उपक्रमाचे नागरिकांतर्फे समर्थन व स्वागत केले.
नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने से. ५८ ए, नेरुळ येथील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, निवृत्त सनदी अधिकारी सुनिल पोरवाल, जी. एस. गील, कर्नल आहुजा, माजी नगरसेवक भरत जाधव तसेच मोठया संख्येने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, उद्यान विभागाचे उपआयुक्त दिलीप नेरकर, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल, उदयान अधिक्षक भालचंद्र गवळी, प्रकाश गिरी, विजय कांबळे व इतर अधिकारी उपस्थित होते. सेक्टर ५८ ए, नेरूळ परिसरात महाराष्ट्र शासनातील उच्च पदावरील अनेक निवृत्त व विद्यमान अधिकारी राहत आहेत. या निसर्गरम्य परिसराला अधिक हरित बनविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून या अधिका-यांचे याकामी नेहमीच सहकार्य मिळत असते.

महानगरपालिका क्षेत्रात १५ लक्ष २८ हजार वृक्षसंपदा असून प्रती व्यक्तीमागे एक झाड असे प्रमाण करण्यासाठी नवी मुंबईच्या वृक्षसंपदा वाढीकडे विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली. यामध्ये प्राणी व पक्षांचा अधिवास वाढेल व नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर पडेल अशा देशी वृक्षरोपांची लागवड महानगरपालिकेमार्फत प्राधान्याने करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितल्यावर उपस्थित नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
आजच्या वृक्षरोपणांतर्गत नेरुळ सेक्टर ५८ ए परिसरात प्रामुख्याने जांभुळ तसेच वड, पिंपळ, कडुलिंब अशा ५० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. अशा प्रकारचे उपक्रम संपूर्ण महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात येत असून नागरिकांनीही आपल्या परिसराची पुढाकार घेऊन जोपासना केली पाहिजे व आपल्या विभागातील हरित क्षेत्राची जबाबदार नागरिक म्हणून राखण केली पाहिजे असे सांगत महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी महानगरपालिका स्वच्छ, सुंदर व हरित नवी मुंबईसाठी करीत असलेल्या प्रयत्नांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
