“नागपूरचा मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क आणि सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट यासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाचे लॉजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता नागपूरात” – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर, दि. १४: नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून नागपूरचा मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क आणि सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट यासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाचे लॉजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता नागपूरात आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी आज केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड-एनएचएलएमएल या स्पेशल पर्पज व्हेईकल द्वारा वर्ध्याच्या सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट आणि मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क येथे रेल्वे टर्मिनल सेवांचे संचालन परीक्षणाचा प्रारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडे दाखवून पार पडला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वर्धेचे खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील सिंदी (सिंदी रेल्वे स्टेशनजवळ) येथे १५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण सह संयुक्तपणे विकसित करत आहे.
वर्धेच्या सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील कापूस, कापसाची रुई, कपडा, संत्रा, हे मुंबईला न जाता कलकत्त्याच्या हल्दीया मार्गे बांग्लादेशच्या नदीतून थेट बांग्लादेशला जातील यामुळे प्रति कंटेनर दीड लाख रुपये असलेला वाहतूक खर्च हा एक लाख रुपयावर येईल. यामुळे विदर्भातील कापूस, संत्रा, भाजीपाला हा बांगलादेश आणि इतर देशांमध्ये निर्यात मिळेल आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं गडकरी यांनी याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केले.
सुमारे १२०० कोटी रुपयांच्या तरतुदीने नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बांधल्या जाणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कला सिंदी रेल्वेच्या ड्रायपोर्टला जोडून येथे कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस या सुविधा निर्माण करून वर्धा आणि नागपूर शहरातील मोठमोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे जे निर्यातक आहेत त्यांचे क्लस्टर येथे तयार करण्यात येईल. सिंदी येथे कस्टमचे देखील कार्यालय राहणार असल्यामुळे देश-विदेशातील कंटेनर या ठिकाणी येणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये जर हे ड्रायपोर्ट जर व्यवस्थित विकसित झाले तर येथे एक लाख युवकांना रोजगार मिळेल अशी आशा देखील गडकरी यांनी व्यक्त केली. याठिकाणी वर्धा जिल्ह्यातल्या युवकांना प्राधान्याने रोजगार मिळाला पाहिजे असं आपण निर्णय करू आणि प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
WPGN.jpeg)
पश्चिम महाराष्ट्रात नाशिक, मराठवाड्यात जालना आणि विदर्भात सिंदी येथे ड्रायपोर्ट निर्माण करून या माध्यमातून स्त्यावरील वाहतूक मार्गाचा अवलंब न करता रेल्वेमार्गे कंटेनरची वाहतूक होईल आणि वाहतूक खर्चात कपात होऊन आर्थिक व्यवहार्यता वाढेल आणि या भागात उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल असे त्यांनी यावेळी नमुद केले. या परिसरात एक स्मार्ट सिटी तयार करून येथील काम करणाऱ्या कर्मचारी तसेच कामगारांना त्यांच्या पाल्यांसाठी शालेय सुविधा, खेळाची मैदाने, पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना देखील गडकरी यांनी वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना केली.
WG77.jpeg)
नागपूर ते वर्धा या रेल्वे मार्गावर चौथ्या लाईनचे काम चालू झाल्यामुळे तसेच नागपूर ते वर्धा या ब्रॉडगेज मेट्रोचे करार झाले असून वर्धा ते नागपूर हे अंतर केवळ ३५ मिनिटात कापणे शक्य होईल असे देखील त्यांनी सांगितले. सिंदी ते सेलडोह या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि चौपदरीकरण हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या द्वारे १०६ कोटी रुपयांच्या तरतुदीने लवकर चालू करण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी केली. सिंदी रेल्वेच्या परिसरामध्ये ज्या अनावश्यक वृक्षांच्या प्रजाती आहे त्या काढून त्या ठिकाणी बांबू तसेच वृक्षारोपण करून आणि येथील भागाला एक हरित भाग म्हणून तयार करण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी संबंधितांना केले. या ड्रायपोर्टसाठी लोकप्रतिनिधींचा मल्टीमोडल प्रकल्पातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती यांचा सहभाग असणाऱ्या एक सल्लागार मंडळ स्थापन करण्याचेदेखील गडकरी यांनी यावेळी जाहीर केले.

याप्रसंगी बोलताना वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले की, २०१४ पूर्वी वर्धामध्ये केवळ १६० किलोमीटर लांबीचे रस्ते होते आता ५६० किलोमीटर रस्त्यांची लांबी वाढली आहे. या सिंंदी पोर्टच्या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन झाले त्यांना दुप्पट मोबदला मिळाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल असे देखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी एनएचएलएमएलचे अधिकारी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अधिकारी, जेएनपीटी, कॉनकोरचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
