सुपारी, संत्र्यांची माळ गळ्यात घालून आमदारांचं विधिमंडळाच्या परिसरात आंदोलन
नागपूर, दि. ७: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, ‘मीचांग’मुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने फक्त चाळीस तालुके दुष्काळी जाहीर केले बाकीचे नाही, बाकीच्यांसाठी नेमलेल्या उपसमितीची अद्याप बैठकच झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यातले २२ जिल्हे उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकारच्या उपाययोजना तोकड्या असून टंचाई सदृश्य हा नवा शब्द आणून फसवणूक केली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करून कर्जमाफी करावी आणि यावर नियम ५७ ची सूचना देत सर्व कामकाज बाजूला करून चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सूचनेला परवानगी नाकारली आणि उद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर चर्चेची सूचना द्यावी अशी सूचना केली.
सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. चाळीस तालुके केंद्र सरकारच्या निकषात बसतात म्हणून दुष्काळी घोषित केले आहेत, जे बसत नाहीत त्यांना राज्य सरकार तेवढीच मदत देणार आहे, दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली आहे, NDRFच्या दुप्पट मदत देत आहोत, असं सांगत कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला पूर्ण मदत करू अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विद्यमान सदस्य गोवर्धन शर्मा, माजी सदस्य बबनराव ढाकणे, गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव शिंदे, शेख रशीद शेख शफी, राजाराम ओझरे, वसंतराव कार्लेकर, गोविंद शेंडे, दिगंबर विशे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला त्याला सभागृहाने संमती दिली आणि दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहील्यानंतर सभागृहाचे आजचे कामकाज संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

